कोल्हापूर - गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरात कचरा उठाव करणाऱ्या काही घंटागाडी कर्मचाऱ्यांना आज सुखद अनुभव आला. ज्या प्रभागात दररोज घंटागाडीतून कचरा उठाव करत होते, त्याच प्रभागातील नागरिकांनी कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करत, शाल देऊन तर काही ठिकाणी नोटांचा हार घालून सत्कार केल्याचे पाहायला मिळाले.
प्रभागातील नागरिकांकडुनच अशा पद्धतीने सत्कार झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा एक वेगळाच आनंद आज पाहायला मिळाला. महालक्ष्मी मंदिर परिसर येथील दैनंदिन कचरा उठाव करणारे घंटागाडी कर्मचारी मारूती घाडगे आणि प्रभाग क्रमांक 44 मंगेशकर नगर परिसरात काम करणारे कर्मचारी रंगराव आवळे या दोघांचा आज नागरिकांनी सत्कार केला.
विशेष म्हणजे, कोरोनाचे महाभयंकर संकट संपूर्ण जगावर आहे. पण, कचरा उठाव कर्मचारी मात्र रस्त्यावर उतरून महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या समोरच हे सर्व घडल्याने त्यांनीसुद्धा प्रभागातील नागरिकांचे आभार मानत त्यांचे कौतूक केले.