कोल्हापूर - ब्रेक द चेन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण लॉकडाऊन करणार नाही असे म्हंटले होते. केवळ शनिवार आणि रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन असणार आहे असे म्हंटले होते. मात्र, प्रत्यक्षात इतर दिवशी सुद्धा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. याला आमचा विरोध असून सरकारला आम्ही 72 तासांचा अल्टिमेटम देत आहोत. जर दुकान सुरू करण्यास परवानगी नाही दिली तर संपूर्ण महाराष्ट्रातील दुकाने आम्ही सुरू करू असा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना विविध मागन्यांचे निवेदन दिले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
निर्णय काहीही असो शुक्रवारी महाराष्ट्रातील दुकाने उघडणार -
कोल्हापुरातील सर्व व्यापाऱ्यांची पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई आदींसोबत बैठक पार पडली होती. व्यापारी शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन साठी तयार होते. मात्र, इतर दिवशी दिवसभर जमावबंदी केली आहे, असे सांगत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यावसाय दुकान बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला. याला या बैठकीमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ने तीव्र विरोध केला होता. मात्र, आम्हाला थोडा वेळ द्यावा असे म्हणत सद्या तरी दुकान बंद ठेवण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले होते. त्यानुसार काल मंगळवारी व्यापाऱ्यांनी दुपारी 3 नंतर आपले व्यवसाय बंद ठेवले. आता सुद्धा शासनाच्या बैठकीतून काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासन नक्कीच आमच्या मागण्यांचा विचार करेल असा विश्वास सुद्धा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यक्त केला आहे. जर असे नाही झाल्यास निर्णय काहीही असो 72 तासानंतर म्हणजेच शुक्रवारी कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील दुकान, व्यवसाय आम्ही सुरू करू असा इशारा सुद्धा शेटे यांनी दिला.
व्यापाऱ्यांची विनंती शासनाला काळवणार -
आज (बुधवारी) चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे बाबत निवेदन सादर केले. पूर्ण लॉकडाऊन न करता आमचे व्यवसाय, दुकान सुरु करण्यासंदर्भात निवेदनातून मागणी करण्यात आली. व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केलेली ही विनंती शासनाला कळवणार असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.