कोल्हापूर - या देशात कोणीही रक्ताच्या तुटवड्यामुळे मृत्यूमुखी पडू नये, यासाठी एक तरुण गेल्या 5 महिन्यांपासून भारतभ्रमंतीसाठी बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे तो चालतच भारतभ्रमंती करत आहे. 5 महिन्यांपूर्वी घरातून बाहेर पडलेला तरुण आता कोल्हापुरात पोहोचला आहे. आपल्या या अनोख्या उपक्रमामुळे अनेक जण रक्तदानासाठी पुढे येत असल्याचे त्या तरुणाने म्हटले आहे. कोण आहे हा तरुण आणि काय आहे त्याचे स्वप्न पाहूयात.
'रक्तदानाचे महत्व पोहोचवणे हेच ध्येय' - दिल्ली येथील किरण वर्मा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आपला हातभार लावत आहेत. वेळेत रक्त न मिळाल्याने वर्मा यांच्या जवळच्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. माहिती मिळाल्यानंतर देशभरात असे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो, असे वर्मा यांना समजले. त्यानंतर त्यांनी रक्तदान करण्याबाबत आपण जनजागृती करावी, ही कल्पना त्यांच्या मनामध्ये आली. ते या मोहिमेसाठी पाच महिन्यांपूर्वी घराबाहेर पडले. विशेष म्हणजे आपल्या मोहिमेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी त्यांनी ही मोहीम पायी चालत पार करायची असा विचार केला. त्यानुसार त्यांनी दक्षिण भारतातून आपली मोहीम सुरू केली असून, दिल्ली येथे ते त्याचा शेवट करणार आहेत. 21 हजार किलोमीटर पायी चालण्याची त्यांनी ही अनोखी जनजागृती यात्रा सुरू केली असून, ती लवकरच पूर्ण होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत रक्तदानाबद्दल महत्व पोहचेल, असेही किरण वर्मा यांनी सांगितले.
'देशात दीड कोटी लोकांना दरवर्षी रक्ताची गरज' - यावेळी आपल्या मोहिमेचे उद्दिष्ठ सांगताना वर्मा म्हणाले, देशात कोणीही वेळेत रक्त न मिळाल्याने मृत्यूमुखी पडू नये हा एकमेव उद्देश आपला आहे. दरवर्षी, जवळपास दीड कोटींहून अधिक लोकांना रक्ताची गरज भासते. त्यापैकी जवळपास 70 टक्के पर्यंत आपण रक्त गोळा करण्यात यशस्वी आहे. पण जवळपास 30 टक्के लोकांना आवश्यक असलेले रक्त गोळा करण्यात आपण अपयशी होतो. त्यामुळे जवळपास 50 लाख लोकांना जरी रक्तदानासाठी तयार केले. तरी, देशभरात जेवढ्या लोकांचा रक्ताच्या कमतरतेमुळे मृत्यू होतो तो आपण वाचवू शकतो, असे वर्मा सांगतात. शिवाय हे खूप सोप्पं काम आहे जे आपण सर्वजण करू शकतो. जास्तीत जास्त लोकांनी समोर येऊन रक्तदान चळवळीत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मोहिमेमुळे 26 कॅम्प द्वारे 2 हजार नवे रक्तदाते - दरम्यान, त्यांनी ही मोहिम सुरू केल्यापासून आजपर्यंत अनेकांनी प्रेरणा घेऊन जवळपास 26 हुन अधिक मोठे रक्तदान कॅम्पचे आयोजन केले आहे. शिवाय या महिन्यात सुद्धा 16 नवे कॅम्प आयोजित केले जाणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले. या पार पडलेल्या 26 कॅम्पमध्ये 3 हजारांहून अधिक लोकांनी रक्तदान केले असून, त्यातील 1 हजार लोकं अशी आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले आहे. त्यांच्या या मोहिमेची हीच विशेष बाब असल्याचे ते सांगतात.
'28 डिसेंबर पासून चालतोय' - आपण ही मोहिम 28 डिसेंबर 2021 रोजी त्रिवेंद्रमपासून सुरू केल्याचे वर्मा सांगतात. आत्तापर्यंत जवळपास साडे तीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून, 21 हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण करायचा असल्याचेही ते सांगतात. आजपर्यंत आपण स्वतः 45 वेळा रक्तदान केले असून , अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यामुळे आपल्यामुळे जीव वाचेल या भावनेतून तसेच माझ्या मोहिमेला साथ देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे, असेही किरण वर्मांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Electric Vehicles : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला उतरती कळा; ३० टक्क्यांनी खरेदीत घट