कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 6 वर्ष उलटून गेलेत. मात्र, त्यांची हत्या कुणी केली याचा तपास आणखी लागलेला नाही. याच्या निषेधार्थ आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापूरमध्ये येथील पोलिसांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएस आणि सीबीआयकडे द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला. महागाईच्या निषेधात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रेशन चळवळ हाणून पाडणाऱ्या सरकारचाही यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.
'हत्येच्या तपासात निष्काळजीपणा'
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला सहा वर्ष उलटून गेले आहेत. मात्र, या तपासात कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या कालावधीत अनेक पोलीस अधिकारी कोल्हापुरात येऊन गेले. प्रत्येक वेळी तपासात हे ना ते कारण देत कॉम्रेड पानसरे यांना न्याय देण्यापासून वंचित ठेवले आहे. जवळपास सर्वच अधिकाऱ्यांनी कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या तपासात निष्काळजीपणा केला आहे, असा आरोप करत आज कोल्हापुरातील बिंदू चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात राजकीय दबावाला बळी पडून पोलीस आपली भूमिका बजावत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, याचा कोल्हापुरातील बिंदू चौक येथे आज निषेध करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीसाच्याकडे असणारा तपास काढून तो एटीएस आणि सीबीआयला द्यावा अशी मागणी या निदर्शने वेळी करण्यात आली आहे.
महागाईच्या विरोधात घोषणाबाजी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य नागरिकांनी आवाज उठवावा. केंद्र सरकारने महागाईत वाढ केल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक घडी विस्कटली आहे. महागाई कमी करावी, अन्यथा डावी आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.