कोल्हापूर - उन्हाच्या झळा जसजशा तीव्र होत चालल्या आहेत. तसतसे अनेक पक्षांचे पाण्याविना प्राण जात असतात. म्हणूनच या पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावं, यासाठी कोल्हापूरात अनेक सामाजिक संस्था काम करत असतात. कोल्हापूरातील 'वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन' सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून झाडं तसेच पक्षांना वाचविण्यासाठी नेमही उपक्रम राबवत असते. यावर्षी सुद्धा या संस्थेकडून जलपात्र तयार करायची कार्यशाळा घेऊन अनेक पक्षांना पिण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. आता त्यांनी बनविलेल्या जलपात्रामध्ये अनेक पक्ष पाणी तर पितातच शिवाय मनसोक्त अंघोळ सुद्धा करत असल्याचे सुखद दृश्ये पाहायला मिळत आहेत.
अनेक पाणवठे जलस्रोतांवर मनुष्याचे अतिक्रमण-
दिवसेंदिवस पक्षांचा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वावर असतो. त्याठिकाणी अनेकांनी अक्षरशः अतिक्रमण केले आहे. या डिजिटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणचे पाणवठे तसेच जलस्रोत पूर्णपणे नष्ट झाले आहेत. झाडंही तोडली जात आहेत. त्यामुळे हळूहळू पक्षांची संख्या कमी होत चालली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे तर शहरामधून पक्षीच गायब झाले आहेत. उरलेल्या काही पक्षांना तरी वाचवने आपली जबाबदारी आहे. म्हणूनच आता त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येकाने पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवणे गरजेचे असल्याचे 'वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन'चे अमोल बुड्डे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.


हेही वाचा- एनआयएकडून सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर तपासणी सुरू