निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करत गोकुळ दूध खरेदीदरासोबत विक्रीदरात वाढ - satej patil
कोल्हापूर जिल्हा वगळून विक्री दरात दोन रुपयाची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना आता दोन रुपये जादा देऊन गोकुळ दूध खरेदी करता येणार आहे.
कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दिलेले आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पूर्ण केले आहे. गोकुळच्या दूध उत्पादकांना दिलासा देत म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयाचे तर गाईच्या दुधात एक रुपयाची वाढ केली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा वगळून विक्री दरात दोन रुपयाची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना आता दोन रुपये जादा देऊन गोकुळ दूध खरेदी करता येणार आहे. त्याबाबतची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली.
11 जुलैपासून लागू होणार नवे दर
कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक केंद्र समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाची आज पत्रकार परिषद पार पडली. यात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील आणि संचालक उपस्थित होते. गोकुळच्या दूध उत्पादकांना दिलासा देणारी घोषणा आज करण्यात आली. गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हशीच्या दूध खरेदी दराला प्रतिलीटर दोन रुपयाची वाढ देण्यात आली. हे नवीन दर 11 जुलैपासून लागू होणार आहेत. याबाबतची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. ते पुढे म्हणाले, की दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन काही दिवसातच आम्ही पूर्ण केले आहे. गोकुळ दूध संघात सत्ता आल्यानंतर प्रत्येक पातळीवर आम्ही बचत करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईत गोकुळची व्याप्ती वाढली पाहिजे, यासाठी राज्य सरकारच्या मदतीने जागा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दोन रुपयांची वाढ
अमूल दूध संघाने दुधाच्या दरात वाढ केल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी गोकुळच्या विक्री दरातदेखील वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातील सांगली, कोकण वगळता इतर सर्व जिल्ह्यात विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
गोकुळची दूध क्षमता वाढवण्यासाठी...
शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळावे, यासाठी अनेक पातळीवर बचत केली. कोल्हापूरच्या मातीत गुण आहे. म्हशीच्या दुधाला मोठी मागणी आहे. त्यामुळे गोकुळची दूध क्षमता वाढवण्यासाठी अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनातारण जिल्हा बँकेच्या वतीने दोन लाखापर्यंत कर्ज म्हैस खरेदी करण्यासाठी देणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यामुळे गोकुळ दररोज वीस लाख लीटरचा दुधाचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही यावेळी म्हणाले.
निवडणुकीत दूध उत्पादकांना दिले होते आश्वासन
पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघात राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विजय झाले. या निवडणुकीच्या प्रचारावेळी दूध उत्पादकांना दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांची वाढ देऊ, असे आश्वासन नेत्यांनी दिले होते. त्यामुळे दूध संघाच्या सभासदांनी गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले. हा शब्द पाळत आज दोन्ही नेत्यांनी दूध खरेदीदरात वाढ केली.