कोल्हापूर - ईडी, एनआयए आणि सीबीआय या संस्था भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या संस्था आहेत. महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याच्या प्रयत्नातून या संस्था वापरल्या जात आहेत, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून ते कोल्हापुरात बोलत होते.
'मुद्दाम रचलेले षड्यंत्र'
पुढे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांनी उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवली. त्याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही. मी अनेकवेळा याबाबत मागणी केली. स्फोटके कोणी ठेवली याबाबत वारंवार मी प्रश्न उपस्थित केले आहेत. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके कोणी ठेवली याचा मास्टरमाइंड कोण आहे, हे एनआयए अद्याप शोधू शकली नाही. मात्र या आरोपीने जबाब दिला त्यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्या आधारे परमवीर सिंग यांनी वाजे यांना नोकरीवर घेतले, त्याची चौकशी करावी, मात्र हे सोडून अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे सांगेल तशी चौकशी केली जात आहे. वास्तविक हे मुद्दाम रचलेले षड्यंत्र आहे, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.
'पटोलेंनी काळजी घ्यावी'
प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी व अधिकार आहे. मात्र आपला मित्र पक्ष दुखावणार नाही, याची काळजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.