कोल्हापूर - दरवर्षी येणाऱ्या अंगारकी संकष्टीला राज्यातील गणेश मंदिरे फुलून जातात. मात्र, यंदा दीड वर्षानी आलेल्या व वर्षाच्या पहिल्या संकष्टीला गणेश मंदिरे भाविकांविना ओस पडली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाने मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज कोल्हापुरातील सिद्धिविनायक मंदिर व बिनखांबी गणेश मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. यामुळे अनेकांनी बाहेरूनच गणेशाला वंदन केले.
अंगारकी संकष्टी निमित्त राज्यातील अनेक गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, ही गर्दी टाळण्यासाठी राज्यातील प्रमुख गणेश मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील ओढ्यावरील गणेश मंदिर आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले होते. दरवर्षी अंगारकी संकष्टी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी मंदिराबाहेरूनच दर्शनाचा आनंद लुटला. अनेकांना प्रवेशद्वारावर डोके टेकून श्री गणेशाला वंदन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने प्रवेशद्वारावरच मंदिर बंद असल्याचा फलक लावला आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर असल्याशिवाय प्रवेशद्वाराजवळून थांबू नये असे फलक लावले आहेत. तसेच अंगारकी संकष्टी निमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेले कार्यक्रम रद्द केले आहेत.