कोल्हापूर - माजी खासदार निवेदिता माने यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विनय कोरे यांची भेट घेतली आहे. निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने हे शिवसेनेकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर विनय कोरे यांचा पाठिंबा धैर्यशील माने यांच्यासाठी निर्णायक ठरणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळेच त्यांच्या पाठिंब्याबाबत ही भेट घेतल्याचे समजते. विनय कोरे यांनी अध्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे.
जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील माने यांनी काही दिवसांपूर्वी संक्रांतीच्या वेळेस जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांची भेट घेतली होती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचा दबदबा आहे. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात पहिल्यांदाच माजी खासदार निवेदिता माने यांनी विनय कोरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे समजते.
शिवसेनेच्या धैर्यशील माने यांना कोरेंनी पाठींबा जाहीर जरी केला तरीही पुढे कोरेंना सुद्धा विधानसभेच्या वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण कोरेंच्या विरोधात शिवसेनेचेच उमेदवार उभे असणार आहेत. त्यामुळे अजूनपर्यंत कोरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचेही म्हटले जात आहे.