कोल्हापूर - गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे आमच्या काँग्रेस पक्षातील अतिशय उगवते नेतृत्व आहे. त्यांचे काम मी अतिशय जवळून पाहिले आहे. मात्र, आघाडीमध्ये कशा पद्धतीने जागेची वाटणी झाली याबाबत माहिती नाही. मी त्या प्रक्रियेत नव्हतो, शिवाय कोणाला राज्यमंत्री करायचे कोणाला कॅबिनेट मंत्री करायचे, याबाबत मी बोलणे योग्य नाही. मात्र, मी असतो तर, त्यांना नक्कीच कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी दिली असती, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
हेही वाचा - पट्टणकोडोली विठ्ठल-बिरदेव यात्रा : यंदा भरपूर पाऊस, कडधान्य महाग होणार- भाकनुक
चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतेज पाटील यांचे 50 वर्षांहून अधिक वय झाले तरी राज्यमंत्रीच असल्याबाबत बोलले होते. त्यावरच पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
सतेज पाटील यांच्याबाबत काय बोलले होते अजित पवार?
नुकताच पुण्यात एक कार्यक्रम पार पडला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे 50 वर्षे वय झाले आहे, तरीही काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यमंत्री पदाचीच जबाबदारी दिली आहे, असे म्हटले होते. शिवाय सतेज पाटील अतिशय कर्तृत्ववान असून त्यांच्याविषयी गौरवोद्गारसुद्धा पवारांनी काढले होते. यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, सतेज पाटील आमच्या पक्षातील अतिशय उगवते नेतृत्व आहेत. त्यांना उज्वल असे भविष्य आहे. सत्तास्थापन प्रक्रियेच्या सुरुवातीच्या काळात मी होतो. नंतर जागावाटपाबाबत मी नव्हतो. शिवाय कोणाला कोणते खाते, कोणाला राज्यमंत्री ? कोणाला कॅबिनेट मंत्री करावे याबाबत मी बोलणे उचित नाही. मात्र, मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. आणि आता जर मी असतो तर त्यांना नक्कीच कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी दिली असती, असे चव्हाण म्हणाले.
हेही वाचा - महाविकास आघाडी २५ वर्ष टिकेल; त्या पत्रातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न - मुश्रीफ