कोल्हापूर - कोल्हापूर वनविभागासह (Kolhapur Forest Department) नाशिक आणि इतर वनविभागाने संयुक्तपणे नाशिक येथे मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील लक्ष्मी पूजा साहित्य भांडारवर (Laxmi Puja Sahitya Bhandar) वनविभागाने ही कारवाई केली आहे. नुकतेच कोल्हापूरातील बावडेकर दुकानावर छापा टाकून कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये इंद्राजाल आणि इतर घटक आढळले होते. त्या अनुषंगाने तपास केला असता नाशिक येथेसुद्धा लक्ष्मी पूजा साहित्य भांडार येथे अवैद्य वस्तू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बनवण्यात आलेल्या एसआयटी पथकाने छापा टाकून इंद्राजाल (ब्लॅक कोरल), हत्ता जोडी (घोरपडचे गुप्तांग), साळींदरचे काटे, रानडुक्कर दात तसेच इतर काही वन्यजीव अवयव हे विक्रीसाठी साठा केला असल्याचे सापडले आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार :
दरम्यान, मिळालेल्या महितीनुसार, ऑक्टोबर 2021 महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात झालेल्या विविध पूजा साहित्य भांडार तसेच औषधी दुकानांवर झालेल्या कारवाईमध्ये, इंद्रजाल (ब्लॅक कोरल), रेड सी फॅन, हत्ता जोडी (घोरपडीचे गुप्तांग) हे मोट्या प्रमाणावर सापडले होते. कोल्हापुरातील बावडेकर, हंजे, अशा विविध दुकानात वन्यजीव प्रतिबंधीत माल सापडला होता. त्याच्या अनुषंगाने पुढे चौकशी केली असता, आज सोमवारी सकाळी नाशिक येथील लक्ष्मी पूजा भांडार येथे कोल्हापूर वनविभागाने छापा टाकून संशयित आरोपी कैलास बबन कुलथे याला अटक केली आहे. पंचनामा झाल्यानंतर गुन्हा दाखल करून कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- भांडारात या वस्तू सापडल्या :
या दुकानात वनविभागाने छापा टाकल्यानंतर त्यांना इंद्राजाल (ब्लॅक कोरल) व हत्ता जोडी (घोरपड चे गुप्त अंग/लिंग) साळींदरचे काटे, रानडुक्कर दात, इतर काही वन्यजीव अवयव हे विक्रीसाठी साठा केला असल्याचे सापडले. त्यानुसार तो जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार या वस्तू बाळगणे व विक्री करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी 7 वर्ष कारावास आणि 10 हजार रुपये दंड आहे.
- बनवण्यात आलेल्या एसआयटी पथकाने केली कारवाई :
दरम्यान, राज्यभरात मोठ्या प्रमाणात वन्यजीव तसेच वनस्पतींचा वापर करून विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कोल्हापुरातसुद्धा एका दुकानात कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार धागेदोरे तपासत नाशिक येथेसुद्धा अशापद्धतीने विक्री होत असल्याची माहिती मिळाली. वनविभागाने त्यासाठी राज्यभरातील 5 अधिकाऱ्यांची विशेष शोध पथक, एसआयटी स्थापन केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक नाशिक नितीन गुदगे,विभागीय वनाधिकारी विशाल माळी (कोल्हापूर), उपवनसंरक्षक महादेव मोहिते (सातारा), आदी सर्व वन अधिकारी आणि कर्मचारी कारवाईसाठी स्वतः नाशिकमध्ये सहभागी झाले होते.