कोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर कोल्हापुरातून पहिली एसटी बस धावली आहे. परिवहन मंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांनी कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या अन्यथा कारवाईचा इशारा सुद्धा दिला होता. त्यामुळे कोल्हापुरातील काही कर्मचारी आता कारवाईच्या भीतीने कामावर हजर होत आहेत. आज कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकातून सकाळी एसटी पुन्हा धावली आहे. त्यामुळे एसटी संपात फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक कर्मचारी अध्याप संपावर ठाम -
एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र कर्मचारी आम्हाला पगारवाढ नको तर विलीनीकरण हवे आहे असे म्हणत अनेक जण अजूनही संपावर ठाम आहेत. कोल्हापूरात सुद्धा अध्याप हजारो कर्मचारी संपावर आहेत. मात्र कारवाईच्या भीतीने काही कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले असून एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला कोल्हापूर इचलकरंजी एसटी बस आज धावली.
बस स्थानकात पोलीस बंदोबस्त -
काही कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाल्याने काही मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बस स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. शिवाय संपावर असलेल्या कर्मचारी आणि कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची सुद्धा होत आहे.
हेही वाचा - ST WORKER STRIKE : एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम; आझाद मैदानातून घेतलेला आढावा...