कोल्हापूर - राज्यात ब्रेक द चेन च्या अंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून कोणीही घराबाहेर पडू नये असे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडणाऱ्यांवर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी दिवसभरात जवळपास 2 लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. 175 गाड्या सुद्धा जप्त करण्यात आल्या होत्या. आज सुद्धा जिल्ह्यात 1 हजार 922 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. 210 वाहने सुद्धा जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून साडे तीन लाखांहून अधिक दंडही वसूल करण्यात आला आहे.
कालच्या तुलनेत आज अधिक दंड वसूल -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कडक निर्बंध घालण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. आज सुद्धा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण 3 लाख 47 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आज अशी झाली कारवाई -
विनामास्क - 369 जणांवर कारवाई
विनामास्क दंड - 97 हजार 400 रुपये
विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेले - 1 हजार 922
एकूण वाहने जप्त - 210
विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेल्यांकडून वसूल केलेला दंड - 2 लाख 50 हजार 300 रुपये