कोल्हापूर - शहरातील एका माजी सैनिकाने डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. येथील कळंबा परिसरातील जिवबा नाना जाधव पार्क येथे ही घटना घडली. दिनकर पांडुरंग मगदूम (वय ४५ ) असे मृत माजी सैनिकाचे नाव असून करवीर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिनकर मगदूम हे माजी सैनिक होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी कात्यायनी परिसरात विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. गेल्या चार महिन्यांपासून घरगुती कारणास्तव त्यांची पत्नी सविता, मुलगा सौरभ आणि मुलगी वैष्णवीसोबत त्यांच्या माहेरी पाचगाव येथे राहत होते. गुरुवारी रात्री उशिरा दिनकर मगदूम यांनी आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती, त्यांच्या एका जवळच्या मित्राला फोनवरून कळवली होती. ही माहिती त्या मित्राने मगदूम यांची पत्नी व मुलगा सौरभ याला फोनवरून सांगितली. त्यानंतर मुलगा सौरभ व नातेवाइकांनी जिवबा नाना पार्क येथील घरामध्ये धाव घेतली. त्यावेळी दिनकर मगदूम बेशुद्धावस्थेत पडलेले त्यांना दिसून आले. त्यांनी मगदूम यांना तत्काळ कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयासह कोल्हापुरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेले. या ठिकाणी त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात आले होते.
सकाळी सातच्या सुमारास हे सर्व जण घरी पोहोचले. मुलगा सौरभ व नातेवाईकांनी दिनकर मगदूम यांना वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये ठेवले होते. त्यानंतर सौरभ सह अन्य नातेवाईक खालील मजल्या वर येऊन थांबले होते. दरम्यान सकाळी साडेसातच्या सुमारास दिनकर मगदूम यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज येताच मुलगा सौरभसह सर्व नातेवाईक वरील मजल्यावर गेले. त्यावेळी दिनकर मगदूम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे व मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेची माहिती त्यांनी करवीर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयाकडे पाठवला. दरम्यान, मगदूम यांनी आर्थिक विवंचनेतून व मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.