कोल्हापूर - प्रकाशाचा सण म्हणून भारतात दिवाळी सण साजरा केला जातो. या आनंदोत्सवाची प्रतिवर्षी प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतो, त्यामध्ये लहान मुलांसह मोठ्यांना विशेषत: फटाके फोडण्याचे नेहमीच आकर्षण असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिवाळीमध्ये दररोज केवळ 2 तासच फटाके वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेही केवळ ग्रीन फटाकेच फोडून यंदाची दिवाळी साजरी करावी लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा मात्र, फटाके विक्रेते आणि निर्माण कंपन्यांना याचा फटका बसला आहे. एकदंरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यावरील या बंदीचा व्यावसायिकांना कशापद्धतीने फटका बसला, यावरचा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..
कोरोनामुळे केवळ 2 तास फटाके वाजविण्याची परवानगी - दरवर्षी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात नागरिक फटाके वाजवत असतात. सायंकाळ होताच रात्री उशिरापर्यंत फटाक्यांचा आवाज सुरूच असायचा. शिवाय प्रदूषणामध्ये सुद्धा प्रचंड वाढ व्हायची. मात्र यंदा कोरोनाने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच आता प्रशासनाने काही कडक पावले उचलली आहेत. कोरोना हा श्वसनाच्या संबंधिताचा विकार असल्यामुळे प्रदुषणावर नियंत्रण राहावे म्हणून प्रशासनाने दररोज केवळ 7 ते 9 या या वेळेतच फटाके वाजविण्याची परवानगी दिली आहे.
ग्रीन फटाके वापरा अन्यथा कारवाई - फटाके वाजविण्याची परवानगी देण्यात आली असली तरी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ ग्रीन फटाके वाजविण्याची परवानगी दिली आहे. जे विक्रेते मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे फटाके विकतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच फटाके वाजविण्याऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार आहे. त्यामुळे सर्वांनी ग्रीन फटाक्यांचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा फटाके व्यावसायिकांना फटका - दरवर्षी लाखो रुपयांची फटाके व्यवसायातून उलाढाल होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करत आहेत. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत फटाके खरेदीला यंदा खूपच कमी लोकांची पसंती दिसत आहे. शिवाय कोरोनाबाधित रुग्णांना, वृद्धांना त्रास होऊ नये यासाठी अनेक रुग्णालय परिसर आणि कोव्हिड सेंटर परिसरात तर ग्रीन फटाक्यांना सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे यंदा याचा फटाके व्यावसायिकांना फटका बसला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत कमी स्टॉल - कोल्हापूरात विविध ठिकाणी फटाक्यांचे अनेक स्टॉल असतात. येथील बागल चौक परिसर आणि येथील आयर्विन ख्रिश्चन हायस्कुलच्या मैदानावर अनेक स्टॉल असतात. मात्र यंदा काही स्टॉल कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवाय प्रशासनाकडून सुद्धा दिवाळीपूर्वी केवळ 2 दिवस आधीच परवानगी मिळाल्याने व्यावसायिकांनी सुद्धा यंदा नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कोरोनाचे सावट अद्याप कमी झाले नल्याने आणि प्रशासनाचा निर्णय फटाका फोडण्याविरोधी असल्याने विक्रेत्यांनी यंदा स्टॉल टाकण्याकडे कानाडोळा केल्याचेही चित्र दिसून येत आहे.
ग्रीन फटाके म्हणजे नेमकं काय ? जवळपास 30 ते 40 टक्के प्रदूषण कमी करणाऱ्या ग्रीन फटाक्यांना सुप्रीम कोर्टाने 2018 साली परवानगी दिली. या ग्रीन फटाक्यांमध्ये कमी हानिकारण घटक असतात. त्यामुळे वायू प्रदूषणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळते. शिवाय ग्रीन फटाके कमी डेसीबलमध्ये आवाज करतात, याच्या तुलनेत इतर फटाके खूपच जास्त आवाज करत असतात.
ग्रीन फटाक्यांबाबत प्रशासनाकडून जनजागृतीची गरज - एकीकडे प्रशासनाने ग्रीन फटाके वापरण्याबाबत आदेश काढले असले तरी जनजागृतीमध्ये प्रशासन मागे पडले आहे. अजूनही अनेकांना ग्रीन फटाके म्हणजे काय? हेच माहिती नाही. तर अनेक जागृत नागरिक स्वतःहून प्रदूषण कमी होईल, अशा फटाक्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने ग्रीन फटाके वापराबाबत आणखी जनजागृती करण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे.