कोल्हापूर- कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवाजी विद्यापीठाचा 57 वा दिक्षांत समारंभ या वर्षी ६ एप्रिलला ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व ७७ हजार ५४३ विद्यार्थ्यांना पोस्टाच्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र पाठवण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि दीक्षांत विभागाकडून ऑनलाइन समारंभ आणि प्रमाणपत्र वितरित करण्याची तयारी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ३० हजार पदवीप्रमाणपत्राची छपाई पूर्ण झाली असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आले आहे.
राज्यातील अन्य विद्यापीठांप्रमाणे शिवाजी विद्यापीठाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित २९३ महाविद्यालयांमध्ये दीक्षांत समारंभ होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन शिवाजी विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना केले आहे. या वर्षी पदवी प्रमाणपत्रासाठी शिवाजी विद्यापीठाकडे ७७ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळाच्या निर्णय आणि मान्यतेनुसार या विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी घरपोच पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली आहे. त्यासाठी शिव दीक्षांत प्रणालीच्या माध्यमातून काम सुरू आहे. याअंतर्गत सोमवारपर्यंत ३० हजार प्रमाणपत्राची छपाई पूर्ण झाल्याची माहिती आहे. ८,५०० प्रमाणपत्रे लॅमिनेशन करून पाठवण्यासाठी तयार आहेत. येत्या चार दिवसात प्रमाणपत्रांची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. यंदा विद्यापीठाच्या ऑनलाइन दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंग कोशारी तर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे, प्रमुख उपस्थिती असणार आहेत. यावर्षी पीएचडीचे विद्यार्थी आणि राष्ट्रपती कुलपती पदक विजेते अशा मोजक्याच सहा विद्यार्थ्यांना राज भवनमध्ये कुलपतींच्या हस्ते पदक प्रदान करून त्यांची चित्रफीत ऑनलाइन समारंभामध्ये दाखवण्यासाठी नियोजन विद्यापीठाने केले असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली आहे.