कोल्हापूर : दरवर्षी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात येत असतात. भक्तांकडून नवस श्रद्धा आणि सेवेकरिता अशा विविध कारणासाठी मंदिरातील दक्षिणा पेटीत भरभरून दान करण्यात येत असते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या सोमवारी उघडण्यात आल्या ( Ambabai Temple Donation BoX Opened ) आहेत. या दानपेट्यातील रोख रक्कम आणि सोने- चांदी मोजण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दानपेट्यात दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटांचे प्रमाण जास्त आहे ( Old Currency In Donation Box ) .
चार दिवसांपासून काम सुरु : मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून या नोटा मोजून बंडल करून ठेवायचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या ४ दिवसांपासून हे काम सुरू असून, अंबाबाई मंदिर आणि परिसरात एकूण 12 दानपेट्या आहेत. त्यातील 9 दान पेट्या उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे. दानपेट्यातील रक्कम ही मंदिरातील गरुड मंडपात मोजायला सुरूवात करण्यात आली आहे. देवस्थान समितीतील कर्मचाऱ्यांसह मंदिरातील सुरक्षा रक्षक, बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांकडून नोटा मोजल्या जात आहेत.
सोन्या-चांदीची शुद्धताही तपासणार : तर गेल्या 4 दिवसात 1 कोटी 48 लाख रुपये जमा झाले असून, काही भक्तांनी दान पेटीत सोने चांदी देखील टाकले आहेत. हे सर्व सोन चांदी वेगवेगळे करून त्याची शुद्धता तपासून त्याचेदेखील वजन आणि आकडेवारी काढण्यात येत आहे. या सर्वांमध्ये धक्कादायक बाब म्हणजे या दानपेटीमध्ये काही जुन्या चलनातून बाद झालेल्या 500 च्या जुन्या नोटाही काही भक्तांनी दान केल्या आहेत.
सोने चांदी सह परदेशी चलन मोठ्या प्रमाणात दान : कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने सर्व नियम शिथिल केल्याने अंबाबाई मंदिरात देखील नियम शिथिल झाले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसात अनेक भक्त, पर्यटक मंदिरात येत दानपेटीमध्ये रोख रकमेसह सोने-चांदी चे दागिने आणि दक्षिणा पेटीमध्ये टाकत आहेत. यामुळे दानपेट्या लवकर भरत असल्याने सोमवारपासून मंदिरातील काही पेट्या उघडण्यात येत आहेत. यामध्ये सोने-चांदीसह अनेक परदेशी चलन देखील सापडले असून, या सर्वाची मोजदाद सध्या सुरू आहे. तर या सर्वांची वर्गवारी करून सोन्याची शुद्धता तपासून नकली असलेले सोने चांदी बाजूला काढून अस्सल सोने चांदीचे वजन करून त्याला सुरक्षित ठेवण्यात येत आहे. तर पैशाचे देखील वेगवेगळ्या नोटांचे बंडल करून ठेवण्यात येत आहेत. पैसे मोजण्यासाठी मशीन देखील आणण्यात आली आहे. तर परदेशी चलनदेखील वेगवेगळी करण्यात येत आहेत.
काही भक्तांनी टाकल्या जुन्या ५०० च्या नोटा : अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजदाद सध्या सुरू आहे. मात्र, या दानपेटीत चालनातून बाद झालेल्या जुन्या पाचशेच्या नोटाचे बंडलही सापडले आहेत. यामुळे मोजणारे देखील हैराण झाले असून, भक्तीच्या नावाखाली थेट देवीलाच फसवण्याचा प्रकार काहींनी सुरू असल्याचे चर्चा होत आहे. मात्र असे कृत्य न करण्याचे आवाहन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जुन्या चलनातून ५०० व १००० च्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. यामुळे भ्रष्टाचार करणारे आणि काळा पैसा जमा केलेल्या लोकांचे धाबे दणाणले होते. याचा परिणाम अजूनही अशाप्रकारे दिसत आहे.