कोल्हापूर - आमचे सहकारी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे असे अचानक निघून जाणे अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेससह जिल्ह्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवाय एक जिंदादिल सहकारी आज गमावला अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. हैद्राबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मात्र, आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांचे पार्थिव येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात आणण्यात आले होते. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
सामाजिक क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रात काम मोठे : पालकमंत्री -
यावेळी पालकमंत्री म्हणाले, आमदार जाधव हे अत्यंत शांत मनमिळावू आणि लोकप्रिय असं व्यक्तिमत्त्व होते. शहरातील पेठा पेठांमध्ये जाधव यांच्यावर प्रेम करणारी लोकं आहेत. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. राजकीय, क्रीडा, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम कोल्हापूरकर कधीही विसरणार नाही. त्यांच्या जाण्याने एक जिंदादिल सहकारी आज गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांची उणीव मला सदैव भासणार आहे, अशा शब्दात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना पालकमंत्री पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाच - Omicron In India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले दोन रुग्ण