कोल्हापूर - अनेकवेळा मुक्या प्राण्यांचे बरणीमध्ये वगैरे तोंड अडकून मृत्यू झाल्याची घटना सर्वांनी ऐकल्या आणि पाहिल्याही असतील. कोल्हापुरातल्या हॉकी स्टेडियम परिसरात सुद्धा एक भटकी गाय पत्र्याच्या कंपाऊंडमधून बाहेर येताना दोन्ही पत्र्याच्या मध्ये तिचे तोंड अडकले. जवळपास 15 मिनिटे ही गाय त्या ठिकाणी अडकून होती. मात्र, एका व्यक्तीची त्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी जवळच असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ याठिकाणी धाव घेऊन दोन्ही पत्रे बाजूला करून गाईची सुखरूप सुटका केली. हॉकी स्टेडियम चौकात तैनात असलेल्या पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस आणि होमगार्डनी तात्काळ धाव घेत केली मदत -
कोल्हापुरात कडक लॉकडाऊन सुरू आहे. यावेळी हॉकी स्टेडियम परिसरात तैनात असलेल्या पोलिसांना म्हाडा कॉलनी येथील रहिवासी दिनकर कांबळे, प्रफुल्ल कांबळे यांनी एका गायीचे तोंड दोन पत्र्यामध्ये अडकले असल्याची माहिती दिली. यावेळी येथील ट्रॅफिक पोलीस कर्मचारी विलास भारती, विठ्ठल जरग, तानाजी सुंबे, महेश बांगर, फैयाज अत्तार यांच्यासह होमगार्ड सचिन पाटील, कुमार तांबेकर, विकास कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्वांनी मिळून दोन्ही पत्रे बाजूला केले आणि गाईला जीवदान दिले. थोडा उशीर झाला असता तर धारधार पत्र्यामुळे कदाचित गायीचा यामध्ये मृत्यू झाला असता.
अशी घडली घटना -
हॉकी स्टेडियम परिसरात एका प्लॉटभोवती पत्र्याचे कंपाऊंड करण्यात आले आहे. या प्लॉटमध्ये नकळत एक भटकी गाय चाऱ्याच्या शोधात गेली होती. मात्र, बाहेर पडण्याचा मार्ग न दिसल्याने दोन्ही पत्र्याच्या मधून गाय येण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तिचे तोंड धारधार पत्र्यांच्या मध्ये अडकले. तात्काळ पोलिसांनी धाव घेऊन तिची यातून सुटका केल्याने दुर्घटना टळली.