कोल्हापूर - मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मध्यमवर्गीय नागरिकांना खड्ड्यात घालायचं काम भाजपने केले आहे. संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर तीन कृषी कायदे लादले असल्याची टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. शिवाय देशामध्ये सातत्याने अन्यायकारक इंधनाचे दर वाढत चालले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. म्हणूनच याच्या निषेधार्थ आज काँग्रेसतर्फे राज्यव्यापी उपोषण सुरू असून, कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेरसुद्धा एक दिवसीय उपोषण करण्यात आले. स्वतः गृहराज्यमंत्री सतेज पाटील या उपोषणामध्ये सहभागी झाले होते. यावेळी पक्ष निरीक्षक शिरीष चौधरी हे सुद्धा उपस्थित राहिले होते. दरम्यान, आंदोलनस्थळी वाढलेल्या इंधन दरांचा उल्लेख असलेली 15 ते 20 फुटांची गॅसची टाकी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
हेही वाचा - कोल्हापूरकरांनी चाखली सीडलेस जम्बो द्राक्षांची चव
केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खड्ड्यात घातले
सर्वसामान्य लोकांना चांगले दिवस दाखवू अशी खोटी आश्वासने देत भाजप सरकार केंद्रामध्ये सत्तेत आले. सर्वसामान्यांचे भले करू अशी खोटी आश्वासने दिली. मात्र आता परिस्थिती पाहिली तर सर्वच माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना या सरकारने खड्ड्यात घातले आहे. ते मोठ्या व्यापाऱ्यांना सहकार्य करत आहेत, मात्र सर्वसामान्यांची लूटच सुरू असल्याची टीकासुद्धा सतेज पाटील यांनी यावेळी केली. दरम्यान, काँग्रेसचे पक्ष निरीक्षक यांनीसुद्धा भाजपवर निशाणा साधत सर्वसामान्यांची होत असलेली लूट थांबली पाहिजे असे म्हंटले. शिवाय आजच्या उपोषणाला मिळालेला पाठिंबा पाहून जिल्ह्याचे नेतृत्व करत असलेल्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे कौतुकही चौधरी यांनी केले.
पेट्रोल डिझेलचे दर एकसारखेच झाले -
यावेळी वाढलेल्या इंधन दराबाबत बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये खूप मोठी तफावत असायची. मात्र जेव्हापासून भाजप केंद्रामध्ये सत्तेत आले आहे, तेव्हापासून इंधनाचे दर गगनाला भिडत चालले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर आता जवळपास एक झाले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरी पार करून पुढे गेले आहेत, असेही सतेज पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शासकीय यंत्रणेचा वापर करून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न - सतेज पाटील