कोल्हापूर - पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करण्यास मान्यता द्या असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
प्रदूषण रोखण्यासाठी वर्षावर बैठक -
पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर उपस्थित होते. या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई सुद्धा उपास्थित होते.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक देखरेख ठेवणार -
आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रदूषणास कारणीभूत असलेल्या सर्वच घटकानांबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानुसार संबंधित विभागासह मुख्यमंत्री सचिवालयामार्फतही बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांचे पथक संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवणार असून दर महिन्याला अहवाल देणार आहेत.