कोल्हापूर- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून खासदार समंभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात मराठा मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी सुरू झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी देखील हजेरी लावली आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांनी आरक्षणाबाबत त्यांची भूमिकाही पुण्यातून स्पष्ट करणारे असल्याचे सांगितले आहे.
कोल्हापुरातील मराठा मूक आंदोलनात जिल्ह्यातील दहा आमदार, मंत्री, खासदार यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी हजेरी लावून आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी मराठा आरक्षणप्रश्नी बोलताना पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नी संभाजी राजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केले आहे. या आंदोलनाबाबत छत्रपती यांनी माझी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली, तर मी माझी भूमिका पुण्यातून स्पष्ट करेन. कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनाला मी एक सामान्य नागरिक म्हणून पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचे रणशिंग फुकण्यात आले आहे. यामध्ये सर्वच नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन आपली भूमिका मांडायची आहे. बुधवारी शाहू समाधीस्थळापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असून नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि कोकण मध्ये पाहिल्या टप्प्यात आंदोलने होणार आहेत. दरम्यान, आजच्या मूक आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.