कोल्हापूर - महाविकास आघडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच मी म्हणालो होतो, की शिवसेनेने गृहखाते आपल्याकडे घ्यावे. अन्यथा राष्ट्रवादी 'मातोश्री'बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावतील. त्यावेळी माझी चेष्टा केली, मात्र आज उद्धव ठाकरेंना हे लक्षात येईल, की मी तेव्हा काय म्हणत होतो. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. ( Chandrakant Patil On Shiv sena ) यावेळी त्यांनी काँग्रेससह राष्ट्रवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला, शिवाय राष्ट्रवादी हा पक्ष स्वार्थासाठी कोणत्याही पक्षाला सोबत घ्यायला तयार असतो असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'राष्ट्रवादी तुम्हाला कधी ना कधी दगा देईल' - यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष कधी काँग्रेसमध्येच होता. तो कधी राष्ट्रवादी झाला. कधी सोनिया गांधी यांच्यासोबत होता. कधी कधी काँग्रेस पक्षासोबत नव्हता, हा त्यांचा सगळा इतिहास आहे. त्यामुळे कधी ना कधी राष्ट्रवादी पक्ष तुम्हाला दगा देणार, म्हणूनच गृहखाते आपल्याकडे ठेवा असे मी बोललो होतो. आता काय होतय ते त्यांच्या आपापसांत ठरेल, असेही पाटील म्हणाले. आज गृहमंत्री पदावरून झालेल्या सर्व चर्चांवर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत सेनेला चिमटा काढला.