कोल्हापूर - संपूर्ण कर्नाटकसह महाराष्ट्राचेही लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारूण पराभव झाला असून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महापालिकेच्या एकूण 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने तब्बल 36 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तर यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने 9 तर 10 जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. यामध्ये एमआयएमचा सुद्धा 1 उमेदवार निवडून आला आहे. दरम्यान, सत्तेचा दावा करणारी एकीकरण समिती चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे.
एकीकरण समिती 32 वरून 2 वर; मराठी भाषिकांना मोठा धक्का -
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व होते. मात्र समितीच्या या सत्तेला यावर्षी सुरुंग लागला असून केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. समितीने एकूण 58 पैकी 21 जागांवर निवडणूक लढवली होती. इतर राष्ट्रीय पक्षांनी यामध्ये भाजप आणि काँग्रेसने सर्व जागांवर आपले उमेदवार दिले होते. त्यामध्ये भाजपचा 36 जागांवर विजय झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर काँग्रेसचा 9 जागांवर विजय झाला आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अपक्ष उमेदवारांनी सुद्धा तब्बल 10 जागांवर विजय मिळविल्याने याचीच सर्वाधिक चर्चा सुरू आहे. एमआयएमचा सुद्धा 1 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला आहे.
- बेळगाव मनपात नगरसेवकांची संख्या 58
- महापालिकेतील सत्तेसाठी 27 होती मॅजिक फिगर
- तब्बल आठ वर्षानंतर यंदा निवडणूक
- 2013 साली यापूर्वीची निवडणूक
- वॉर्ड रचनेबाबत कोर्टात वाद सुरू असल्याने निवडणूक होती लांबणीवर
- बेळगाव महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष आपल्या चिन्हावर लढवली गेली
- यापूर्वी बेळगाव महापालिकेची निवडणूक मराठी विरोधात कन्नड आणि उर्दू भाषिक
- यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार होते निवडणुकीच्या रिंगणात
- यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत 21 उमेदवार होते निवडणुकीच्या रिंगणात
- यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव महापालिकेमध्ये महापौर
- संगीता पाटील होत्या बेळगावच्या महापौर
- 2018 साली बेळगाव महापालिका मुदत संपली
- कर्नाटक राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना केल्यामुळे कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती
- निवडणूक झाल्यानंतर आता बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता
हे ही वाचा - अकोला: पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
मतमोजणी केंद्राबाहेर, पोलिसांनी केला लाठीचार्ज -
सोमवारी सकाळी कॅम्प येथील बि. के. मॉडेल हायस्कूल येथील केंद्रावर मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी केंद्राजवळील काही अंतरावर उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत होती. जिल्हाधिकार्यांचा आदेश डावलून उमेदवारांचे समर्थक प्रचंड संख्येने मतमोजणी केंद्राजवळ गर्दी करत होते. विजयी उमेदवारांचे समर्थक घोषणाबाजी त्याचबरोबर गुलालाची उधळण करत होते. मतमोजणी केंद्राबाहेर होत असलेला गोंधळ सर्वांना चक्रावून टाकणारा होता. मतमोजणी केंद्राबाहेर झालेली गर्दी पाहून पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीच्या बळाचा वापर केला. विजयी उमेदवारांनी मिरवणुका काढू नये. नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केले आहे.