कोल्हापूर - तपास यंत्रणेकडून बॉलीवूडमध्ये दहशत पसरून खंडणी वसूल केली जात असल्याची चर्चा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक वारंवार करत होते. तेच आता खरे झाले आहे. आज साक्षीदारानेच आपली साक्ष दिली आहे. पुढच्या तपासात हे सिद्ध होईल. मात्र, साक्षीदार आरोपीला घेऊन जातात हे आम्ही जगात पहिल्यांदाच पाहिले आहे. असा टोला ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.
शासकीय विश्रामगृहात पार पडली बैठक -
बंगलोर महामार्गावरील कागल ते सातारा या रस्त्याचे सहापदरीकरण होणार आहे. कराड इथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याहस्ते या कामाचा शुभारंभ झाला. या वेळी दिलेल्या सूचनेनुसार आज कोल्हापूर सांगली सातारा येथील या लोकप्रतिनिधींची बैठक कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. गेल्या दोन वर्षापासून कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसतो आहे. त्याला महामार्गावरील पूल ही काही प्रमाणात कारणीभूत आहेत. त्यामुळे या नवीन रस्त्याबाबत लोकांच्या सूचना जाणून घेण्यावर या बैठकीत एकमत झाले. त्याच बरोबर लोकप्रतिनिधींनीही मांडलेल्या काही सूचनांवर विचार केला जाणार असून संबंधित विभागाचे अधिकारी लवकरच त्याची प्रत्यक्ष पाहणी करतील, असे या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
'म्हणून कोल्हापूरची जबाबदारी माझ्यावर द्यावी' -
दरम्यान, अहमदनगरच्या पालकमंत्री पदावर न राहण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे. त्यासंदर्भात बोलताना त्यांनी कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये एकाच वेळी निवडणुका आहेत. दोन्ही जिल्ह्यात लक्ष देता येणार नाही. म्हणून कोल्हापूरची जबाबदारी माझ्यावर द्यावी, अशी मी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे. याचा अर्थ मी कोल्हापूरचे पालकमंत्री पद मागतो आहे, असा होत नाही. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील. तो आपल्याला मान्य आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - माझ्यावर छुप्या हेतूने कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करा, समीर वानखेडेंची पोलिसांना विनंती