कोल्हापूर - जिल्ह्यातील आशा वर्कर्स आता संपाच्या तयारीत आहेत. कोरोना काळातील 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सर्व्हेचे मानधन न मिळाल्यामुळे आशा वर्कर्स आक्रमक झाल्या आहेत. कोरोना काळात काम केलं मात्र मानधन देण्यास कोल्हापूर जिल्हा परिषदेची टाळाटाळ होत आहे. याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे तीन हजार आशा वर्कर्स सोमवारी 8 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार आहेत. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियन तसेच सिटू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष -
संकटाच्या काळामध्ये जिवाची पर्वा न करता दारोदारी जाऊन सर्व्हेचे काम केले. मात्र अद्याप त्याचं मानधन सुद्धा दिलं गेलं नाही. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांचे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून मानधन देण्यात टाळाटाळ करत आहेत, असे आशा वर्कर्स संघटनेने म्हटले आहे.
- शासनाने दिलेल्या निर्णयानुसार आशा यांना दोन हजार रुपयांची वाढ व गटप्रवर्तक यांना तीन हजार रुपये वाढ जुलैपासून मिळणार होती. मात्र अद्यापही ही मिळाली नाही ती तत्काळ देण्यात यावी.
- गटप्रवर्तक यांचा 625 फिरती भत्ता कमी केला तो देण्यात यावा.
- मागील वर्षी पूरपरिस्थिती मध्ये केलेल्या सर्व्हेचे मानधन मिळावे.
- आयुष्यमान भारत मध्ये 50 वर्षावरील जेष्ठ नागरिक हा सर्व्हे करण्यात आला. त्याचंही मानधन तत्काळ मिळावे.
- माझे कुटुंब माझी जबाबदारीचा सर्वे करून घेतला. मात्र त्याचं मानधन सुद्धा मिळालेले नाही ते तत्काळ मिळावे.
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचा 'समृद्धी महामार्ग' पाहणी दौरा, कार्यकर्त्यांना परवानगी माध्यमांना मात्र 'नो एंट्री'
हेही वाचा- तोपर्यंत नव्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करू देणार नाही; नितेश राणेंचा इशारा