कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. दररोजच 500 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत, तर 15 ते 20 रुग्णांचा मृत्यू होत आहे. आता येथील कळंबा मध्यवर्ती कारागृह कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. जवळपास 37 बंदीजनांना कोरोनाची लागण झाली असून कारागृह प्रशासनास याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातील सर्व ६५ कारागृहांमध्ये असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व बंदीजनांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना राज्याच्या गृह विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार या सर्व कारागृहांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बंदीजनांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी देऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, सांगली येथील कारागृहामधील काही बंदीजनांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी व बंदीजनांची कोरोना चाचणी पंधरा दिवसांपूर्वी करून घेतली होती. सुरुवातीला आय.टी.आय येथे नव्याने स्थापन केलेल्या तात्पुरत्या उपकारागृहामधील तीन कच्च्या कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ कळंबा कारागृहामधील बुढ्ढा बराक येथील पाच बंदीजनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करून त्यांच्या संपर्कातील ४० हून अधिक बंदीजन व कर्मचाऱ्यांना कारागृहातील कोविड यार्डमध्ये विलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी ३७ जणांचा कोरोना अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला आहे. या बराकमधील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता ४२ वर पोहोचली आहे. त्यामुळे कारागृह आता कोरोना हॉटस्पॉट बनल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - कोल्हापूरकरांचा दणका..! एशियन पेंटने 'ती' जाहिरात यु ट्यूब वरून हटवली