कोल्हापूर - राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी दिलेले मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. त्याच्या देखभालीच्या खर्चांसाठी राज्य सरकार पैसे देत नसल्याने अनेक सेविकांना आर्थिक फटका बसत आहे. अंगणवाडी सेविकांच्या खासगी मोबाईलवरून शासकीय काम करण्याची वेळ सेविकांवर आली आहे. त्यामुळे मोबाईल आणि पोषण ट्रॅकर अॅपबाबत राज्य सरकारने मराठी माध्यमाची भूमिका घ्यावी. अन्यथा तुमचे मोबाईल परत घ्यावेत या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयावर जवळपास हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा राज्यातील सेविका मुंबईत धडक देतील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल खराब -
राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या कामकाजासाठी मोबाईल दिलेले आहेत. हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. असा आरोप राज्यातील अंगणवाडी सेविकांनी केला आहे. अनेक मोबाईल जुने झाल्याने सतत नादुरुस्त होऊन त्याच्या दुरुस्तीसाठी चार ते पाच हजार रुपयांचा खर्च येत असल्याचा आरोप काही सेविकांनी केला आहे. तसेच या मोबाईलवर रिचार्ज संदर्भात कोणतीच मदत राज्य सरकार करत नसल्याने सेविकांना आर्थिक फटका बसत आहे. ही गरज लक्षात घेता राज्य सरकारने पोषण ट्रॅकर अॅप हे मराठी माध्यमात करावे. उच्चप्रतीचे मोबाईल अंगणवाडी सेविकांना द्यावेत, अशी मागणी आता सेविकांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा
या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनकडून जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने लादलेल्या पोषण ट्रॅकर अॅप हा सदोष असून तो सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लादला जात आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये रॅमवर रोम कमी असल्यामुळे तो डाऊनलोड होत नाही. असे अनेक तांत्रिक अडचणी अंगणवाडी सेविकांना येत आहेत. त्या अडचणी राज्य सरकारने दूर कराव्यात, अशी मागणी आता अंगणवाडी सेविकांकडून होत आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्या -
- अंगणवाडी सेविकांचे मानधन पोषण आपला जोडू नये.
- अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता 2000 करावा तसेच अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा.
- अंगणवाडी सेविकांच्या युनिफॉर्मचे पैसे तत्काळ जमा करावेत.
- कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविकांना तत्काळ मदत करावी.