कोल्हापूर : तब्बल सात ते आठ महिन्यानंतर करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी कोरोना काळात ज्या सफाई कर्मचारी, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासनाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत कोल्हापूर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्या सर्व कोरोना योद्ध्यांना अंबाबाईच्या दर्शनाचा मान दिला. शिवाय त्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्वागत सुद्धा केले.
हेही वाचा - उघडले देवाचे द्वार! पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली राज्यातील प्रार्थनास्थळे..
कोरोनाचे संकट लवकर टळो हीच प्रार्थना -
कोरोनामुळे अंबाबाई मंदिर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. मात्र शासनाने आजपासून राज्यातील सर्वच मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी दिली असून त्यानुसार सकाळपासून मंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबत नेटकं नियोजन केले असून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शनाची योग्य पद्धतीने सोय होईल याची काळजी सुद्धा घेतली जात असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले. शिवाय कोरोनाचे हे संकट लवकरच टळो अशी प्रार्थना सुद्धा त्यांनी अंबाबाई चरणी केली आहे.
हेही वाचा - मनमाडमधील सर्व धार्मिक स्थळे उघडली, धर्मगुरुंनी मानले सरकारचे आभार
कोरोना योद्ध्यांनी समितीचे मानले आभार -
७ ते ८ महिन्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र देवस्थान समितीने दर्शनाची सर्वात पहिला संधी कोरोना योद्ध्यांना दिली याबाबत समितीचे आभार सुद्धा सर्व योद्ध्यांनी मानले. यावेळी दर्शन भेटल्यानंतर सर्वच भक्तांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी सर्वच कोरोना योद्ध्यांचे गुलाब पुष्प देऊन मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले.