कोल्हापूर - देव जसा संकट निर्माण करतो तसा त्या संकटाला तारणारा देखील पाठवत असतो, असे म्हटले जाते. असाच प्रत्यय आंबेवाडीतील ग्रामस्थांना आला आहे. पूर्ण गाव महापुराच्या वेढ्यात सापडले आहे. मात्र, आंबेवाडीतील आंबी कुटुंब हे जवळपास तीनशे पूरग्रस्तांच्या मदतीला देवदूत म्हणून धावून आले आहेत. आपला आलिशान बंगला हा जनावरं, गाड्या पार्किंगसाठी खुला केला आहे. इतकेच नव्हे तर जवळपास तीनशे जणांना आसरा या बंगल्यात दिला आहे.
हेही वाचा - kolhapur flood : हॉस्पिटल्समधील रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच इतका मोठा महापूर आला आहे. जिल्ह्यातील 262 गावं पूरबाधित आहेत, तर आतापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आले आहे. यंदाच्या महापुराचा फटका हा सर्वात जास्त आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावांना बसला आहे. ही दोन्ही गावं संपुर्ण पाण्याखाली गेली आहेत. ही गावं चारही बाजूंनी पाण्याने वेढली असून, गावात पंधरा फुटापेक्षा जास्त पुराचे पाणी आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठताच आंबेवाडीतील ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पावसाचे प्रमाण पाहता पाणी झपाट्याने वाढत गेले. आंबेवाडीतील ग्रामस्थ स्थलांतरितच्या तयारीत असताना कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर भलेमोठे झाड कोसळल्याने स्थलांतर करण्यास अडथळा आला. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा आपल्या घराचा आसरा घेतला. मात्र, गेल्या चोवीस तासात पडलेल्या प्रचंड पावसामुळे सध्या गावात पंधरा ते वीस फुटांपर्यंत पाणी आहे. ज्यांची घरे दोन मजली आहेत, त्यांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावर आसरा घेतला. मात्र, ज्यांची घरं कौलारू आणि एक मजली आहेत त्यांची घरं मात्र पाण्याखाली गेली. अशा वेळी गावातील आंबी कुटुंब या सर्वांच्या मदतीला धावून आले आहे.
गावातील तब्बल 40 पेक्षा जास्त कुटुंबांना आसरा देण्याचे काम आंबी कुटुंबाने केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंबी कुटुंबाने गावातील जवळपास 300 पेक्षा अधिक लोकांना आपल्या घरात आसरा दिला आहे. तर खालचा मजला जनावरांसाठी खुला केला आहे. त्याच ठिकाणी अडकलेल्या जवळपास 100 हून अधिक दुचाकींचे पार्किंग केले आहेत.
- जनावरांसाठी आलिशान घराचा बनवला गोठा -
आंबी कुटुंब हे एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. चार मजली घरात पुरात अडकलेल्या ग्रामस्थांची सोय करण्यात आली होती. गावातील ग्रामस्थांना आसरा देण्यासोबत त्यांच्या जनावरांना वाचवण्यासाठी आंबी कुटुंब धडपडत आहे. सर्वात खालच्या मजल्यावर जनावरांना बांधले आहे. जवळपास 40 हून अधिक जनावरे याठिकाणी आहेत.
- संपूर्ण कुटुंब भोजन व्यवस्थेत -
महापुरात अडकल्यानंतर जवळपास तीनशे पेक्षा जास्त नागरिकांनी आंबी कुटुंबाच्या घरी आसरा घेतला. मात्र, भुकेने व्याकूळ झालेल्या लहान मुलांना आणि नागरिकांना एक तरी घास मिळावा यासाठी आंबी कुटुंब धडपडत राहिले. घरातील भात आणि आमटी देऊन पूरग्रस्तांच्या पोटाला आधार दिला.
हेही वाचा - पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ; 2019 च्या महापुराची पुनरावृत्ती होण्याची भीती