कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढीचा वेग स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सुद्धा दिवसभरात 43 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 311 वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या किंचित वाढत चालली असल्याने नागरिकांसह प्रशासनाने सुद्धा अधिक काळजी घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातल्या एकूण 311 रुग्णांपैकी 221 रुग्ण सद्या घरातूनच उपचार घेत आहेत. तर उरलेले 90 जण जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोव्हिड सेंटर किंवा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 50 हजार 816 वर पोहोचली आहे. त्यातील 48 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 311 इतकी झाली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 311 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1749 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण काही प्रमाणात कमी जरी असले तरी रुग्ण संख्या किंचित वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरली आहे.
जिल्ह्यात उत्तम उपाययोजना -
कोरोना काळात कोल्हापूरमध्ये झपाट्याने रुग्ण वाढले तसेच उपाययोजना सुद्धा मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी अत्याधुनिक सामग्रीसह कोव्हिड सेंटर उभी करण्यात आली होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा राज्यात चांगले होते. आता सुद्धा रुग्ण संख्या वाढली तर प्रशासन पुर्णपणे सज्ज असून अजूनही नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितलं जातं आहे. महापालिकेकडून तर अजूनही नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र काही नागरिक या सर्व नियमांना धाब्यावर बसवून बिनधास्तपणे सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे अशा नागरिकांनी आता अधिक सावध राहणे गरजेचे आहे.
कुठे किती रुग्ण-
कोल्हापूर जिल्ह्यात सद्या 311 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यातील 221 जण घरातूनच उपचार घेत आहेत. तर उरलेल्या एकूण 90 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 90 रुग्णांपैकी सर्वाधिक 19 रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये 14 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर भुदरगड मधील एका कोव्हिड केअर सेंटरमध्ये तसेच डायमंड हॉस्पिटल कोल्हापूर येथे प्रत्येक 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात सुद्धा सद्या 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घरामध्ये उपचार सुरू असलेल्या एकूण 221 रुग्णांपैकी 173 रुग्ण हे केवळ कोल्हापूर शहरातील आहेत तर 48 रुग्ण हे ग्रामीण तसेच नगरपालिका क्षेत्रातील आहेत.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 57 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1903
11 ते 20 वर्ष - 3550
21 ते 50 वर्ष - 26954
51 ते 70 वर्ष -14638
71 वर्षांवरील - 3714
जिल्ह्यात असे एकूण 50 हजार 816 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 895
2) भुदरगड - 1247
3) चंदगड - 1231
4) गडहिंग्लज - 1533
5) गगनबावडा - 154
6) हातकणंगले - 5347
7) कागल - 1690
8) करवीर - 5767
9) पन्हाळा - 1878
10) राधानगरी - 1256
11) शाहूवाडी - 1365
12) शिरोळ - 2515
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 7561
14) कोल्हापुर महानगरपालिका - 15866
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 2511
हेही वाचा- राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी, अंशत: टाळेबंदी; प्रसार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला