कोल्हापूर - महापुरामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व पंपिंग हाऊस पाण्यात बुडाले होते. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा गेल्या 4 दिवसांपासून पूर्णपणे बंद होता. मात्र, यातील दोन पंप सोमवारी(26 जुलै) सुरू झाले असून, मंगळवारी निम्म्याहून अधिक शहराला थोडा वेळ पाणी मिळणार आहे. बालिंगा येथील 2 पंप सुरू झाले आहेत. बालिंगा पंपिंगवर असणाऱ्या भागांना मंगळवारी पाणी मिळणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 2019 च्या अनुभवावरून गेल्या वेळीपेक्षा 3 दिवस अगोदर पाणी पुरवठा सुरू केला आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी पाण्यात उभं राहून दिवस रात्र काम करून हे कार्य पूर्ण केले आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत शहराला पाणी मिळावे यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम सुरूच होते.
नागदेववाडी आणि शिंगणापूर पंपाचेसुद्धा लवकरच काम पूर्ण होईल :
दरम्यान, चार पंपिंग हाऊसच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यातील दोन पंपाचे काम पूर्ण झाले आहे. आजपासून नागदेववाडी व शिंगणापूर पंपिंगवरील काम सुरू होऊन ते पंपसुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी प्रयत्न करत आहेत.
4 ते 5 दिवसांपासून शहरात पाणी टंचाई :
महापुरामुळे चारही पंप बंद पडल्यामुळे शहरात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद पडला होता. त्यामुळे शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. शहरातील अनेक भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, आता दोन पंप सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.