ठाणे - डोंबिवलीतील एका ज्वेलर्सच्या दुकानात घुसून अज्ञात व्यक्तीने ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोर हा तोंडावर मास्क ( attack on Jewelers owners Dombiwali ) घातलेला होता. हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या हल्ल्यात दुकान मालक गंभीर जखमी झाला असून हल्लेखोर पसार झाला आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
ज्वेलर्स मालकावर रुग्णालयात उपचार सुरु : डोंबिवलीतील आगरकर रोडवर मन्ना तारकनाथ यांचे मन्ना ज्वेलर्स नावाने दुकान आहे. (बुधवारी) दुपारच्या सुमारास मन्ना आपल्या दुकानात होते. याच दरम्यान एक अज्ञात हल्लेखोर दुकानात आला त्याचा चेहरा झाकलेला होता. त्याने मन्ना यांना चाकूचा धाक दाखवला. घाबरलेल्या दुकान मालक मन्ना यांनी प्रतिकार केला असता त्याने चाकूने मालकावर हल्ला केला. या हल्ल्यात मन्ना गंभीर जखमी होताच हल्लेखोर तिथून पसार झाला. या हल्ल्यात मन्ना याना दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय : याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. अद्याप हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी याबाबत आरोपीला लवकर अटक करून सांगितले, मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.
आता मास्कचा वापर गुन्ह्यांसाठी : कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली होती. मात्र आता मास्कचा वापर गुन्ह्यांसाठी केला जात आहे. त्याचवेळी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे ज्वेलर्स दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा निषेध करत हल्लेखोराला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ज्वेलर्स संघटनेने केली आहे.
हेही वाचा - प्रेमसंबंध तोडल्याच्या वादातून विधवा महिलेवर कारखान्यात घुसून कैचीने वार; घटना सीसीटीव्हीत कैद ...