कल्याण डोंबिवली (ठाणे) - कोरोनाचा संसर्ग व पावसाळ्यातील साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कल्याण व डोंबिवली शहरात धुरावणी व किटकनाशक फवारणीची विशेष मोहिम आजपासून (दि. 26 जुलै) सुरू करण्यात आली आहे. आज सकाळपासून शिवाजी चौक परिसरात पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसह चार जीप माउंटेड मशीन, 11 ट्रॅक्टर व अग्निशमन दलाच्या सात गाड्यांच्या सहाय्याने एकाचवेळी रस्त्यावर धुरावणी व सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने थैमान घातले असून आतापर्यत 18 हजार 165 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली असून यापैकी आतापर्यंत 298 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 718 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. एकीकडे कोरोनाचे थैमान तर दुसरीकडे साथीच्या आजाराने डोकेवर काढण्यापूर्वी साथरोग फवारणी, डास प्रतिबंधक फवारणी, धुरावणी अशा उपायोजना सर्व प्रभागात राबविण्यात येत आहेत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठोस पावले उचलत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्व प्रभागात करून रस्ते, प्रतिबंधित क्षेत्र, झोपडपट्टी परीसर, संकुले यामध्ये सॅनिटरायरिंझिंग फवारणी, धुरावणी तसेच अग्निशमन दलामार्फत रस्त्यांवर सोडियम हायपोक्लोराईडने फवारणी करण्यात येत आहे.
फवारणीचा पहिला टप्पा रविवारी (दि. 26 जुलै) कल्याण पश्चिम विभागात 2/ब व 3/क प्रभाग क्षेत्रात संपूर्ण परिसरात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत व डोंबिवली पूर्व विभागात फ, ग, आय, ई प्रभाग क्षेत्रात संपूर्ण परिसरात दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत फायर फायटरच्या सहाय्याने सोडियम हायपोक्लोराईडने विशेष जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. उर्वरित भागात दुसरा टप्प्यात ही फवारणी, धुरावणी मोहिम राबविण्यात येणार असून याशिवाय नियमितपणे करण्यात येणारी फवारणी व धुरावणी चालू राहणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी सहकार्य करून रस्ते मोकळे ठेवावेत, गर्दी करू नये जेणेकरून फवारणी व धुरावणी करण्यास अडचण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका महापौर विनिता राणे व पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.