कल्याण डोंबिवली (ठाणे)- कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. शनिवारी ६१५ रुग्ण आढळून आल्याने महापालिका क्षेत्रात एकूण रुग्णसंख्या १२ हजार १५२ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाल्याने रुग्णांवर उपचार करायचे कुठे ? असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
खळबळजनक बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात दरदिवशी शेकडोच्या घरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने १२ जुलैपासून पुन्हा १९ जुलैपर्यत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला. मात्र, वाढवलेल्या लॉकडाऊनमध्ये रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल का ? आता यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
शनिवारी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवलीत १८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ६ हजार २९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५ हजार ६८१ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
२ जुलैपासून पुन्हा लागू केलेल्या लॉकडाऊनमध्येही नागरिकांकडून पालिका प्रशासनाला पाहिजे तसे सहकार्य मिळाले नसल्याने कोरोनाचा संसर्ग इतक्या झपाट्याने वाढत गेला. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ झाल्याने आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून आले आहे. तर सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णायलही रुग्णांनी हाऊसफुल झाले आहेत.
दरम्यान, शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्व २१२, कल्याण पश्चिम १५१, कल्याण पूर्वेत ११९, डोंबिवली पश्चिमेत १०२, टिटवाळा - मांडा परिसरात ५, मोहने येथील २६ रुग्णांचा समावेश आहे.
रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीवर आळा बसावा म्हणून पूर्वीच्या नियमावली प्रमाणे १२ ते १९ जुलैपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन काळात केवळ मेडिकल आणि रुग्णालय सुरु ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.