ठाणे - कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका कोरोना बाधित 37 वर्षीय गरोदर महिलेची सुखरूप प्रसूती होऊन तिने नवजात बाळास जन्म दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही महिला 7 महिन्याची गरोदर असताना तिला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या लालचौकी येथील आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महिलेची प्रकृती गंभीर असतानाच रुग्णालयात दाखल
कल्याण परिसरात राहणारी या गरोदर महिलेची कोरोनामुळे प्रकृती गंभीर असतानाच तिच्या नातेवाईकांनी तिला महापालिकेच्या आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात दाखल केले होते. तसेच तिचे सॅच्युरेशन कमी असल्यामुळे तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यातच काल (दि. 19 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास या महिलेची कोविड रुग्णालयामध्ये 7 महिन्यातच नैसर्गिक प्रसूती होऊन तिने एका नवजात बालकास जन्म दिला.
महिलेची सुखरूप प्रसूती होण्याची पहिलीच घटना
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयात महिलेची सुखरूप प्रसूती होण्याची ही पहिलीच घटना आहे. मात्र, नवजात बालकाचे वजन कमी असल्यामुळे त्यास लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर असलेल्या या महिला रुग्णांची सुखरूप प्रसूती कोविड रुग्णालयामधील वैद्याकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली झाली.
हेही वाचा - जिवाची बाजी लावून चिमुकल्याला वाचविणाऱ्याचे रेल्वेमंत्र्यांनी केले कौतुक, फोन करुन साधला संवाद