ठाणे - लॉकडाऊनच्या कालावधीत दुचाकीवरून एका अल्पवयीन तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला पाच महिन्यांनंतर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेच्या मोबाइलवरून एका नातेवाईकाला कॉल केल्याचा देखील खुलासा झालाय. त्याच एका कॉलच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांच्या जाळ्यात हा आरोपी सापडला. अफसर शेख असे संबंधित आरोपीचे नाव असून तो कल्याणचा (पू) रहिवासी आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असून 14 मे रोजी सायंकाळच्या सुमारास शहाड परिसरात चालत होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अनोखळी व्यक्तीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने लिफ्ट दिली. मे महिन्यात लॉकडाऊनमुळे वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने पीडिता त्याच्या दुचाकीवर बसली. मात्र, तिला सोडल्यानंतर आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यामुळे पीडित मुलगी भयभीत होऊन रडायला लागली. यानंतर आरोपीने तिचा मोबाइल घेऊन स्वतःच्या एका नातेवाईकाला कॉल करून घटनास्थळावरून पळ काढला.
पीडितेच्या मोबाइलवरून नातेवाईकाला फोन..
या घटनेने भयभीत झालेल्या पीडित मुलीने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रसंगाचे कथन केले. यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल केला. मात्र, कोणताही धागादोरा नसल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्याच्या तपासाचं आव्हान वाढलं. अखेर पीडितेच्या मोबाइलवरून ज्या नंबरवर आरोपीने कॉल केला होता, त्याची माहिती पोलिसांनी काढली. हा क्रमांक उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर मागवून घेत तो पीडित तरुणीला दाखवला. यानंतर ओळख पटली; आणि शोध मोहिम सुरू झाली.
पाच महिने पाळत...आणि अखेर बेड्या!
पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवत आरोपीची माहिती शोधली. अफसर शेख असे त्याचे नाव असून कल्याणमधील (पू) कोळसेवाडी परुिसरात तो वास्तव्यास असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यावर पाळत ठेवत अखेर पाच महिन्यांनंतर बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे तांत्रिकदृष्ट्या केलेल्या तपासामुळे या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. कल्याण परिमंडळ- 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. कोकाटे, प्रीतम चौधरी, महिला पोलीस हवालदार संगारे, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.