ठाणे - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, ३० जूनला लॉकडाऊन-४ ची मुदत संपली त्यानंतर मात्र राज्यात ३१ जुलै पर्यंत काही नियम शिथील करत लॉकडाऊन सुरूच ठेववण्यात आला आहे. परंतु, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा व शहरी भागात परिस्थितीनुरूप कडेकोट लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आला असून आवश्यकते नुसार पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
ठाण्यात लॉकडाऊनला सुरुवात-
ठाणे जिल्हा क्षेत्रात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करुन विशेष फरक पडणार नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात २ जुलै रोजी रात्री १२ वाजल्यापासून ११ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अतिरिक्त प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लागू केले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी ठाणे महानगरपालिका हद्दीत दि. ०२/०७/२०२० सकाळी ७.०० ते दि. १२/०७/२०२० सकाळी ७.०० वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच सर्व हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येईल. असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर पोलिसांनी चेक पोस्ट तयार केले आहेत. मात्र, या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
आजपासून ठाण्यात कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला आहे, तर दुसरीकडे इतर दुकाने बंद असली तरी भाजी मंडई सकाळी सात ते अकरा पर्यंत विक्री करण्यासाठी मुभा पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे ठाणेकरांना याचा दिलासा मिळाला आहे.
कल्याण डोबिंवली-
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामध्ये कल्याण डोबिंवली महानगर पालिका क्षेत्रातही रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने २ ते १२ जुलैपर्यंत महानगर पालिका हद्दीत कडेकोट लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात फक्त अत्यावश्य सेवांना परवानगी दिली जाणार आहे.
नाशिक शहरातही लॉकडाऊन-
तसेच नाशिक शहरातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता यापुढे सायंकाळी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजेनंतर विनाकारण घराबाहेर पडणार्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
रत्नागिरीही लॉकच-
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत मंगळवार 30 जून नंतर 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी डिजिटल पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्याच्या सीमा देखील बंद राहतील.रिक्षा, दुकाने बंद; फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
सिंधुदुर्गातही कडेकोट अंमलबजावणी होणार-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यात दिनांक 8 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आजापासून सुरू झाली आहे.