ठाणे - भिवंडीतील राहनाळ गावात बस स्थानकाजवळ असलेल्या दौलत कंपाऊंड येथे एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे धाग्यांचे कोम जळून खाक झाले आहे.
लॉकडाऊनमुळे व्यापार-उद्योग बंद आहेत. मात्र, या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर दोन तासात आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. संबंधित गोदामाच्या बाजूलाच थोड्या अंतरावर पेट्रोल पंप आहे. मात्र, वेळेत आग विझल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, याच राहनाल गावातील कांचन कंपाऊंड येथे मागील आठ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धाग्यांचे कोम साठवलेल्या गोदामाला मोठी आग लागली होती. त्यामुळे या आगीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमधून उलट सुलट चर्चा ऐकायला येत आहेत. देशभर संचारबंदी असूनही भिवंडीत आग लागण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यामुळे या आगी नेमकी लागतात कि लावल्या जातात, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.