कल्याण (ठाणे) - अनैतिक मानवी तस्करी पथकाचे कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये छापेमारी केली. विशेष म्हणजे या छापेमारी वेळी देहविक्री करण्यामध्ये चार बांगलादेशी महिलांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी चारही बांगलादेशी महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या एका दलालाला अटक केली आहे.
मोहन उर्फ सनातन सुरेंद्र बर्मन (वय 33) असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. तर त्यांचा जितू नावाचा साथीदार फरार आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मोहन उर्फ सनातन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येसह पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.
लॉकडाऊनमध्ये लेडीज बारसह आर्केस्ट बार बंद होती. आता पुन्हा अनलॉकमध्ये बार सुरु झाले. मात्र ग्राहकांची पूर्वीसारखी वर्दळ नसल्याने याच बारमधील वेटर म्हणून काम करणाऱ्या काही इतर महिलांसह बांग्लादेशी महिलांही देहविक्री व्यवसायकडे वळल्याचे यापूर्वी ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाचे देहविक्रीच्या ठिकाणी मारलेल्या छापेमारीत समोर आले होते. कल्याण पूर्वेतील नांदिवली गावात एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये आरोपी मोहन व जितू ये दोघे बांगलादेशी महिलांना फसवून व जबरस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेत असल्याची माहिती शनिवारी अनैतिक मानवी तस्करी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर देहव्यापारासाठी महिला पुरविणाऱ्या दलालाशी संपर्क साधून बनावट ग्राहक याठिकाणी पाठवला, त्यांनतर आदींपासून सापळा रचून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दलाल मोहनला रंगेहात पकडले असून त्यांच्या तावडीतून चार बांगलादेशी पीडित महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भादंवि. 370(2), 370(3), 34 सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करून दलालासह चार बांग्लादेशी महिलांना अटक केली. अटकेतील दलाल व पीडित महिलांना आज न्यायालयात हजर केले असता बांगलादेशी महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली. तर दलाल मोहन याला अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वींही 'शेर ए पंजाब लॉज'वर मारला होता छापा -
ऑक्टोंबर महिन्यातच मुंबई नाशिक महामार्गावर राजनोली नाका परिसरातील शेर ए पंजाब लॉजवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने छापेमारी करीत देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन दलालांना अटक करून येथील देहविक्री करणाऱ्या तीन बळीत महिलांची सुटका केली होती.