ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यत पालिका हद्दीत ११७ रुग्ण आढळले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झालाय. तर ३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महारामरीची तीव्रता कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना विषाणू प्लास्टिक पिशव्यांवर तीन दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो. त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पालिकेने व्यापा-यांना केले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी भाजीपाला व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी कापडी पिशवी बाळगणे आवश्यक आहे. विक्रेते प्लास्टिकच्या पिशवीत भाजीपाला देत असल्याने त्यामार्फत विषाणू पसरण्यास हातभार लागू शकतो. प्लास्टिकच्या वापरावर पूर्ण: बंदी असली, तरीही सर्रास वापर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पूर्ण प्लास्टिक बॅन करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.
प्लास्टिक पिशव्या आढळ्यास प्लास्टिक बंदी अधिनियम 2018 कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. या सुचनेनूसार बहुतांश व्यापा-यांनी 23 एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केला आहे. पिशव्या बंद झाल्यामुळे कच-यातील प्लास्टिक मोठया प्रमाणात कमी होण्यास मदत झालीय. मात्र, अद्याप काही नागरिक तसेच भाजी विक्रेते याचा वापर करत आहेत. त्यांना प्लॅस्टिकचा वापर थांबवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.