डोंबिवली (ठाणे) - एका मद्यधुंद रिक्षा चालकाने जोरदार राडा करून कायदा व सुववस्थेचा प्रश्न निर्माण केला. रिक्षावाल्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले. ही घटना पश्चिम डोंबिवली परिसरात शनिवारी (दि. 29 मे) रात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या रिक्षावाल्याला ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती निवळली. शैलेश साहेबराव रॉय (वय 27 वर्षे, रा. पांडुरंग बिल्डिंग, मानपाडा पेट्रोल पंपाजवळ), असे या रिक्षावाल्याचे नाव आहे.
मारहाणीत डोळ्यासह शरीवार दुखापत
डोंबिवली शहरात मोठ्या संख्येने रिक्षा असल्याने रिक्षा रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर दोन लेन व्यापून प्रवाश्यांना उभे केले जाते. अशा परिस्थितीमुळे रस्ता जाम होत असल्याने नागरिकांना वाहने चालविण्यात व जाण्या-येण्यात मोठी अडचण सहन करावी लागते. बऱ्याच वेळा रिक्षाचालक दादागिरी करत असतात. रस्त्यावर आडव्या-तिडव्या रिक्षा थांबविल्याने वाहतूक कोंडी होते. प्रतिबंध वा समज देण्याचा प्रयत्न केला तर हेच रिक्षावाले लोकांना शिवीगाळ आणि वेळप्रसंगी मारहाणही करतात. असाच प्रसंग पश्चिम डोंबिवलीत शनिवारी रात्रीच्या सुमारास महात्मा फुले रोडवर घडला. रेल्वे स्थानकाबाहेर दारूच्या नशेत असलेल्या रिक्षावाल्याने मधल्यारस्त्यावर एक रिक्षा थांबवली आणि येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना तो भाईगिरी करू लागला. हे पाहून काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे हा रिक्षावाला आणखी चिडला. त्यावेळी त्याच्यासोबत असलेली एक महिलाही त्याला समजविण्याचा आणि आवरण्याचा प्रयत्न करत होती. पण, मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा रिक्षावाला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मोठमोठ्याने आरडाओरडा करणाऱ्या या रिक्षावाल्याच्या राड्यामुळे लोकांची मोठी गर्दी जमली. त्याचवेळी भिवंडीत राहणारा सुमित गुप्ता आपल्या मित्रासह स्कूटीवरून जात होता. या रिक्षावाल्याने सुमित गुप्ताला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत सुमितच्या डोळ्यासह शरीरावर दुखापत झाली.
रिक्षावाल्याची गचांडी धरून आणले पोलीस ठाण्यात
रस्त्यावर जमलेल्या गर्दीतील लोकांनी या रिक्षावाल्याला प्रतिबंध केला. त्यामुळे संतापलेल्या रिक्षावाल्याने लोकांवरही हल्ला चढविला. यासाठी त्याने रिक्षात लपविलेला लोखंडी रॉड काढून लोकांवर हल्ला केला. जवळपास अर्धा तासभर हा तमाशा सुरू होता. मात्र, चेक नाका असूनही पोलीस तेथे उपस्थित नव्हते. जखमी सुमितच्या मित्राने वारंवार 100 क्रमांकावर संपर्क साधला, तरीही कोणतीही मदत मिळाली नाही. जेव्हा रेल्वे स्टेशनवरील आरपीएफच्या दोन जवानांकडून मदत घेतली गेली तेव्हा त्यांनी सुमीतच्या डोळ्यातून वाहणारे रक्त पाहून आमचे हे काम नाही, असे सांगून तेथून काढता पाय घेतला. या घटनेदरम्यान त्या ठिकाणी स्थानिक पोलीस असते, तर अशा घटना रोखता आल्या असत्या, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून उमटत होती. त्यानंतर कुणीतरी कळविल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या रिक्षावाल्याची गचांडी धरून पोलीस ठाण्यात नेले.
चार जण जखमी
रिक्षावाल्याने केलेल्या हल्ल्यात सुमित गुप्ता याच्यासह कुणाल विनोद भाईर (वय 22 वर्षे), अजय प्रकाश चव्हाण (वय 21 वर्षे) आणि शिवम राजेद्र सिंग (वय 26 वर्षे), असे चौघेजण जखमी झाले. या हल्ल्यात कुणाल भोईर याच्या डाव्या हाताचा पंजा व उजव्या हाताचा दंड, अजय चव्हाण याची पाठ, तर शिवम सिंग याच्या उजव्या हाताचे दंडापर लोखंडी रॉड वजा पाईपची उपटी मारल्याने मुका मार लागून दुखापत झाली. तर यावेळी झालेल्या झटापटीत कुणाल भोईर याच्या गळ्यातील सोन्याची साखळी कुठेतरी पडून गहाळ झाली. राडेबाज रिक्षावाला शैलेश रॉय याच्याविरोधात विष्णूनगर पोलिसांनी मोटर वाहन अधिनियम 1988 चे कलम 323, 324, 504, 506, 427, 122, 177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्या ताब्यातील रॉडसह (एम एच 05 बी जी3136) रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जन्मठेपाची शिक्षा