ठाणे - इसिस या जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटनेत दाखल होऊन परतलेला तरुण आरिफ मजिद याला सात वर्षांच्या तुरूंगवासानंतर घरी सोडण्यात आले आहे. 2014 मध्ये कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये गेले होते. तिथे हे चारही तरुण इसिसमध्ये सामील झाले. त्यातील आरिफ मजिद हा आई-वडिलांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे भारतात परतला. तथापी त्याचे 3 साथीदार परतले नाहीत. भारतात परतलेला आसिफ हा तुरुंगात होता. जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी आरिफला तुरूंगातून सोडण्यात आले. आता तो कल्याणमध्ये घरी परतला आहे.
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (आयएसआयएस) मध्ये सामील झालेला भारतीय युवक आरिफ मजिद याने एनआयएने केलेल्या चौकशीत खुलासा केला आहे, की आखाती देशातील डॉक्टरांनी या तरुणांना दहशतवादी संघटनेत दाखल केले होते. तरुणांना इराकमध्ये पाठविण्यासाठी आयएसआयएसच्या भरतीमध्ये अनेक ट्रॅव्हल एजंटही सामील असल्याचे मजिद याने एनआयएला सांगितले होते.
भारतात परत आल्यानंतर एनआयएने त्याची बरीच चौकशी केली. तेव्हा आरिफने धक्कादायक संवाद केले. संधी मिळाल्यास पुन्हा आयएसआयएसमध्ये सामील होऊ इच्छितो, असे सांगून आरीफने इसिसविषयी असलेले प्रेम व्यक्त केले होते. इतकेच नाही तर चौकशी दरम्यान त्याने कबुलीही दिली होती, की इसिस नेत्यांनी त्याला लढाऊ क्षेत्रात पाठवले नाही. तेथे तो साफ-सफाई आणि बांधकामाच्या ठिकाणी कामाला होता. त्याने इसिसच्या दहशतवाद्यांना पाणीपुरवठा केला आणि एके 47 रायफल चालवण्याचे प्रशिक्षणही घेले. उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर तुरूंगातून सुटका झालेला आरिफ मजिद कल्याणला घरी पोहोचला आहे. या संदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
आरिफवर कडक निर्बंध -
उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करताना आरीफला कल्याणमधील राहते घर सोडण्यास मनाई केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात पहिल्या दोन महिन्यांसाठी दिवसांतून दोनदा म्हणजे एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी हजेरी लावणे. एनआयएच्या कार्यालयात आठवड्यातून एक दिवस हजेरी लावणे. तसेच आपला पासपोर्ट तात्काळ एनआयएकडे जमा करण्याचे निर्देश त्याला दिले आहेत. इतर आरोपी किंवा साक्षीदारांशी संपर्क न करणे. कोणताही आंतरराष्ट्रीय फोनकॉल करण्यासही मनाई करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे किंवा आसपासच्या परिसरातील रक्ताच्या किमान 3 नातेवाईकांचे पत्ते पुराव्यांसह जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या शिवाय खटल्याचा निकाल लागेपर्यंत आरिब माजिदवर अन्य कुठलाही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा जामीन तात्काळ रद्द करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
कोण आहे आरिफ माजिद ?
कल्याणचा रहिवासी असलेल्या इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आरिफ माजिदने 3 मित्रांसह यात्रेकरूंच्या गटातून 25 मे 2014 रोजी इतिहाद विमानाने बगदाद गाठले होते. त्यानंतर हे चौघेही बेपत्ता होते. इराकमधील इस्लमिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेत ते सामील झाल्याची माहिती समोर आली. मात्र राष्ट्रीय तपास संस्था आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत असताना 26 ऑगस्ट 2014 रोजी सहीम याने त्याच्या भावाला आरिफचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचे फोनवरून कळवले होते. आरिफच्या वडिलांनी मात्र तो जिवंत असल्याचा दावा केला होता. तो भारतात परत येऊ इच्छित असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आरिफला तुर्कस्थानहून भारतात आल्यावर अटक करण्यात आली होती. तेव्हापासून कोठडीत असलेल्या आरिफविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (युएपीए) या दहशतवादविरोधी कायद्याखाली 2014 मध्ये गुन्हा नोंदविला.
सुटकेसाठी आटोकाट प्रयत्न -
आरिफने जामिनासाठी केलेले अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळले होते. मात्र आरिफने पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. तोही फेटाळून लावल्यानंतर त्याने गेल्यावर्षी उच्च न्यायालयात नव्याने अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा आपले जामीन अर्ज हे ज्या आरोपपत्रांच्या आधारे फेटाळून लावले आहेत त्यात आपली बाजू ऐकून न घेताच एनआयए विशेष न्यायालयाने अपील फेटाळले. तसेच त्यांनी दिलेल्या आदेशात विसंगती असून सदर प्रकरणात अनेक साक्षीदार हे फितूर झाले आहेत. त्यामुळे या बदलेल्या परिस्थितीचा विचार न करता माझ्या जामीनअर्जाचा विचार होणे अपेक्षित असल्याची बाजू आरिफ माजिदच्यावतीने खंडपीठासमोर मांडण्यात आली होती.