औरंगाबाद - जागतिक पर्यटन स्थळ म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे नाव येते. मात्र ऐतिहासिक वारसांसोबत आता मेडिकल आणि औद्योगिक पर्यटन स्थळ म्हणून देखील वेगळी ओळख निर्माण होत आहे. मात्र अद्यापही सुविधांचा अभाव असल्याने म्हणावे तसे पर्यटन आणि त्यासोबतचा रोजगार मिळत नसल्याचे मत पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंग यांनी व्यक्त केले आहे.
जागतिक वारसास्थळांमुळे आहे वेगळी ओळख -
औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी ही जागतिक दर्जाची वारसा स्थळ आहेत. त्यामुळे औरंगाबादला जागतिक दर्जाची वेगळी ओळख मिळाली आहे. यासह दौलताबादचा देवगिरी किल्ला, बिबी का मकबरा, पानचक्की यांच्यासह म्हैसमाळ येथील पर्यटन केंद्र हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते. या सर्व वारसास्थळामुळे औरंगाबादला ऐतिहासिक नगरी म्हणून देखील ओळख मिळाली आहे. असे असले तरी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने व्यावसायिकांना म्हणावा तसा रोजगार उपलब्ध होत नाही आहे असे जसवंत सिंग सांगितले.
रस्त्यांच्या समस्येमुळे पर्यटक होतात निराश -
पर्यटन स्थळ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळत नसल्याची ओरड नेहमी केली जाते. त्यात मुख्य समस्या आहे रस्त्यांची. अजिंठा लेणीसाठी असणारा जळगाव रस्त्याचे काम काही वर्षांपासून सुरूच आहे. काम संथगतीने सुरू असल्याने अवघे शंभर किलोमीटर असलेले अंतर कापण्यासाठी तीन ते चार तास लागत होते. त्यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांसह टॅक्सी व्यावसायिक नकार देत होते. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे पाहायला मिळाले. तर इतर ठिकाणांसह शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था पण बिकट असल्याने पर्यटकांना निराश व्हावे लागत असल्याने रस्त्यांच्या समस्या सोडवाव्या, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
विमान कनेक्टिव्हिटी देखील आहे कमी -
औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मात्र प्रत्यक्षात तिथून एकही आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होत नाही. कारण तसे उड्डाण घेण्यासाठी विमानतळावर अनेक गोष्टींचा अभाव आहे. इतकेच नाही तर पर्यटकांना येण्यासाठी मोठ्या शहरांशी जोडणारी उड्डाण नाहीत, जी आहेत त्यांच्या वेळा आणि संख्या पुरेशा नसल्याने पर्यटक इतर ठिकाणी पर्यटनासाठी जाणे पसंत करतात. त्यामुळे विमानसेवा चांगली करण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे मत जसवंत सिंग यांनी संगितले.
पर्यटन स्थळांची जाहिरात बाजी कमी पडते -
देशातील इतर राज्यात कमी पर्यटन स्थळ असूनही त्यांची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यासाठी लोकप्रिय व्यक्तींना पर्यटन दूत म्हणून देखील नेमण्यात आली. मात्र महाराष्ट्र या बाबतीत कमी पडतोय असे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक पर्यटन स्थळ असूनही पर्यटकांची संख्या कमी होण्याची भीती आहे. त्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले पाहिजे असे मत जसवंत सिंग यांनी संगितले.
कोविडमुळे झाला परिणाम -
कोविडमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये मोठा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला. आता विदेशी पर्यटक किती येतील माहीत नाही मात्र देशांतर्गत असणाऱ्या पर्यटकांचे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. मात्र त्यातही ऐन सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारी पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटनावर परिणाम होत आहे. आधीच नुकसान होत असताना लावलेले निर्बंध काढून जास्त गर्दी न करता पर्यटकांना पर्यटन करता आले पाहिजे. असे मत जसवंत सिंग यांनी संगितले.
हेही वाचा - सातारा विशेष : पुष्प पठाराबरोबरच आता कास दर्शन झालं सुलभ; बुधवारपासून बस फेरी होणार सुरू