औरंगाबाद - नवीन महामार्ग तयार होत आहेत. त्यामुळे अंतर कमी आणि गती वाढत असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे गतिमान होत आहे. मात्र, गाडीच्या वेगासाठी लावण्यात येणाऱ्या नियमांचा फटका सर्वसामान्यांना बसतो. वाहनाच्या गतीबाबतच्या धोरणात लवकरच बदल होण्याचे संकेत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार यात मार्ग काढणार असून त्यासाठी कायद्यात बदल करून दिलासा देऊ असे गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी औरंगाबादेत सांगितले.
औरंगाबाद पुणे नवीन महामार्ग होणार - औरंगाबाद-पुणे २६८ किलोमिटर विशेष महामार्ग काम सुरू होणार आहे. हा रस्ता सहा पदरी असणार आहे. या रस्त्याला पुणे, बंगलोर, नगर जोडले जाईल. तर पुणे औरंगाबाद अडीच तासांमध्ये गाठणे शक्य होईल. विशेष म्हणजे हा मार्ग समृध्दी महामार्गाला जोडला जाणार असून १२ हजार कोटींचे बजेट या मार्गासाठी असेल. या प्रोजेक्टमुळे पाथर्डी - शेवगाव सारख्या भागाची वाढ होईल. पुणे औरंगाबाद रिंग रोडचा आरखडा पूर्ण होईल. त्यातून पुण्याच्या बाहेरून मुंबई किंवा इतर भागात जाणे सोपे होईल. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
औरंगाबाद जळगाव रस्ता मार्च पर्यंत पूर्ण होईल - जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ( Ajanta Caves ) पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. मात्र रस्ता चांगला नसल्याने त्यांचे हाल होत असतात. मात्र, आता औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या कामात अडचणी होत्या त्या दूर झाल्या आहेत. हा रस्ता मार्च महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण होईल. जळगाव कडील बहुतांश पूर्ण झालं आहे. अजिंठा घाटातील काम पूर्ण होईल. तर औरंगाबाद वाळूज रस्त्यावर डबल डेकर पुल ( Double Decker Bridge In Aurangabad ) तयार होईल. जुन्या पुलंचा अभ्यास करू, त्यांचा काही भाग वापरता येईल का हे तपासले जाईल. तर रस्त्यावरील अतिक्रमण काढू अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
पैठणला आता चार पदरी रस्ता - औरंगाबाद पैठण महामार्ग बाबत नेहमी चर्चा केली जात होती मात्र, आता पैठण महामार्ग चार पदरी होईल. त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याची गरज पडणार नाही. काही गावातून भुयारी मार्ग, उड्डाण पुल, किंवा बाहेरून रस्ता करायचा या बाबत लवकर निर्णय होईल. तर मराठवाड्यातील जुने काम पूर्ण झाले अजून नवीन कामांबाबत आज आढावा घेतला आहे. १६ हजार कोटींच्या केंद्रांच्या योजनांचा विचार आहे. त्यात काही काम मंजूर केलेली आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.