औरंगाबाद - माझ्या आयुष्यात आलेल्या संकटांमुळे माझी नाव डुबेल असे असताना श्रीकृष्णाला संकटातून बाहेर काढणाऱ्या वासुदेवांसारखा एक वासुदेव मला मिळाला असून, आता मी सावरलो असून राजकारण नाही पण समाजकार्य चालू ठेवणार असल्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. त्यांनी पुन्हा त्यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी वासुदेवाचा उल्लेख केल्याने जाधवांचा वासुदेव कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एक नवा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. आता समाज कार्यासाठी आपली संघटना मजबूत करणार असून त्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे जाधव यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला होता. मात्र या पक्षाला निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली नव्हती. याच पक्षाला आता संघटना म्हणून पुढे विकसित करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून समाजकार्य करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांना एकत्र करून नागरिकांची काम करण्यासाठी मदत करणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या व्हिडिओत सांगितले.
आपण आता राजकीय संन्यास घेऊन आपला वारसा यापुढे पत्नी संजना चालवेल, अशी घोषणा जाधव यांनी केली होती. इतकेच नाही तर रावसाहेब दानवे यांच्यापासून आपल्याला धोका असल्याचे देखील त्यांनी आपल्या व्हिडिओत सांगितले होते. मात्र आता या परिस्थितून सावरलो असून यापुढे समाजकार्य करायचे ठरवल्याचे जाधव यांनी आपल्या व्हिडिओत सांगितले.
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षात असावे असे नाही. राजकारणापासून दूर राहून देखील नागरिकांचे प्रश्न सोडवता येतात. त्यामुळे यापुढे माझा शिवस्वराज्य बहुजन पक्ष आता संघटना म्हणून चालवणार आहोत. त्यासाठी लवकरच राज्याचा दौरा करून समाजकार्य करू इच्छिणाऱ्या युवकांना सोबत घेणार आहे. त्यामुळे माझ्या पुढच्या प्रवासाला मी सुरुवात करेल, अशी घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी केली. मी याआधी माझे म्हणणे मांडले आहे. त्यावेळी माझ्यामुळे कोणी दुखावले असेल तर मला माफ करा, अशी जाहीर माफी जाधव यांनी मांडली. माझी नाव बुडाली असे वाटत असताना कृष्णाला संकटात वाचवणाऱ्या वासुदेवासारख्या एका वासुदेवाने मला वाचवले, असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं. त्यामुळे जाधवांचा वासुदेव कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे.