औरंगाबाद - पंढरपूर महामार्गावरील देवगिरी बँकेजवळ अंदाजे 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. बँकेजवळील मोकळ्या भूखंडावर हा मृतदेह सापडला असून संबंधित व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अद्यापही मृत व्यक्तीची ओळख पटली नसून, खूनाचे कारण देखील गुलदस्त्यात आहे. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, श्वान पथकाचे साहाय्यक फौजदार ए.एस. हारणे, ए. टी. खाकरे यांच्यासह श्वान स्विटी आणि अन्य पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तपासादरम्या श्वान स्विटीने महामार्गावरील वळदगाव कमानीपर्यंत मारेकऱ्यांचा शोध काढला असून, या ठिकाणी एक बियरची बाटली, तसेच पिशवीत जेवण आढळून आले. अद्याप मारेकरी फरार असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.