औरंगाबाद - कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या रुग्णालयात काम करत असल्याने एका परिचरिकेच्या घरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत समोर आली आहे. चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या परिचारिका शिल्पा हिवाळे या जिल्हा रुग्णालयात आपली रुग्णसेवा बजावत आहे. 'तुमच्यामुळे आमच्या परिसरात कोरोना येईल. त्यामुळे तुम्ही आमच्या भागात राहू नका' अशी धमकी हल्लेखोरांनी आपल्याला दिली असल्याची तक्रार परिचरिका शिल्पा हिवाळे यांनी केली आहे.
हेही वाचा... जागतिक परिचारिका दिन : कोरोनाच्या संकटात रुग्णांचा आधार; मेणबत्ती, दिवे लावत सुरक्षेसाठी करणार प्रार्थना
सोमवारी रात्री एकच्या सुमारास काही लोक जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचरिकेच्या घरी आले. दार वाजवत पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी त्यांनी केली. खिडकी उघडताच त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. तुम्ही कोरोनाची ड्युटी करता. त्यामुळे या भागात यायचे नाही, अशी धमकी त्यांनी दिली. तसेच दारावर लाठ्याकाठ्यांनी मार केल्याची तक्रार शिल्पा हिवाळे यांनी केली आहे. याबाबत सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात हिवाळे यांनी तक्रार दाखल केली आहे.
औरंगाबादमध्ये सध्या कोरोनाने थैमान घातले आहे आहे. कोणी अनोळखी व्यक्ती बाहेरून येऊ नये, यासाठी अनेक भाग नागरिकांनी बंद केले आहेत. त्यात कामानिमित्त कोणी जात असेल तर त्यामुळे आपल्या परिसरात कोरोाची बाधा पसरु नये, यासाठी लोक काळजी घेत आहेत. तर काही ठिकाणी परिसरातील लोकांनी बाहेर जाऊच नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील अनेक अडचणी येत आहेत. असाच काहीसा त्रास जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या शिल्पा हिवाळे या परिचारिकेला झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या राहत असलेल्या परिसरातील काही नागरिकांनी त्यांना 'तुम्ही कोरोना रुग्णालयात काम करता येथून जाऊ नका. अशा धमक्या दिल्या आहेत. इतकेच नाही तर, सोमवारी रात्री एकच्या सुमारास काहींनी पाणी मागण्याच्या कारणाने दरवाजा वाजवला आणि नंतर शिवीगाळ करत येथे राहू नका, अशी धमकी दिली' हिवाळे यांनी याबाबत सिडको एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. मात्र, काही लोक ही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा... प्रेयसी, पेन ड्राईव्ह अन् 'ते' व्हिडीओ...ब्रेकअपच्या बदल्यासाठी खतरनाक खेळ
'मला रुग्णालयाकडून निवासस्थान मिळत नाही. त्यात माझा मुलगा आजारी असतो, त्याला एकच किडनी आहे. माझ्या शिवाय घरात स्वयंपाक करणे आणि त्यांची काजळी घेणे शक्य होत नसल्याने मला त्यांना सोडून राहता येत नाही. त्यात आता येथील नागरिक आम्हाला असा त्रास देत आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची सेवा करणे गुन्हा झाला का ?' असा प्रश्न या परिचरिकेने उपस्थित केला आहे.