औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील मासे मृत्युमुखी पडले असून सरोवरातील पाण्यावर मृत मासे तरंगत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सरोवरात दूषित पाणी!
सरोवरात दूषित पाणी येत असल्यामुळे माशांना ऑक्सिजन मिळत नसल्यानेच त्यांचा मृत्यू होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उद्यानाला लागूनच सरोवरात असलेल्या विहिरींचे दूषित पाणी जलपर्णीतून थेट तलावात जात आहे. यापूर्वीही अनेकदा असे झाले आहे. पूर्वी महापालिकेकडून मासेमारी करण्यासाठी व्यावसायिकांना कंत्राट दिले जात होते. मात्र काही वर्षांपासून हे बंद करण्यात आले आहे. सरोवरामध्ये शेवाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने मासे मरू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर सरोवरातील माशांचा मृत्यू एखाद्या आजारामुळे झाला असेल तर त्याची बाधा इतरांनाही होऊ शकते अशीही भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.