औरंगाबाद - इंटरनेटच्या युगात कार्यक्षमता वाढली अस म्हणतात. त्याचा वेगळा प्रत्यय दिवाळीच्या निमित्ताने येतोय. मागील दोन तीन वर्षांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण घेऊन घरीच आकाश कंदील तयार करण्याचा प्रयत्न लहान मूल करत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणेही थांबत आहे.
टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आकाश कंदील
आपल्या घरात अनेकवेळा टाकाऊ वस्तू असतात. मात्र, त्या वस्तूंचा वापर कसा करावा याबाबत कल्पना नसते. ज्यामध्ये पुठ्ठा, कागद, खोके, लाकडी तुकडे, कपडे असे अनेक प्रकारचे टाकाऊ साहित्य असते. मात्र, या वस्तुंपासून आकाश कंदील तयार करण्याची कल्पना अनेकांना सुचते आणि ते त्याप्रमाणे तो तयारही करतात. आणि त्यांचे अनुकरण करून इतर मुले देखील त्याच प्रमाणे घरीच आकाश कंदील तयार करत असल्याचे मागील काही वर्षात दिसून आले आहे.
इंटरनेट मुळे वाढली कल्पकता
कोरोनामुळे मागील दीड वर्षांमध्ये मुलांच्या हातात मोबाईल आला. त्यामधून ते शालेय अभ्यास करतात. मात्र, त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी त्यांना शिकायला मिळू लागल्या आहेत. त्यातून मागील वर्षी असलेले निर्बंध आणि बाहेरून वस्तू घेण्याबाबत असलेल्या भीतीमुळे अनेक लहान मुलांनी वेळेचा उपयोग करत इंटरनेटच्या माध्यमातून घरीच आकाशकंदील तयार केले. त्यामुळे त्यांच्या कल्पकतेत भर पडली. आणि परिणाम म्हणून यंदा देखील मुलांनी घरीच कंदील तयार करण्याचे काम केले. ज्यामध्ये कागद आणि पुठ्ठ्यांचा वापर करून जास्त प्रकाश देणारे आकाशदिवे साकारले गेले. घरीच आपल्या हाताने तयार केलेले कंदील लावताना आनंद वाटत असून यापुढेही घरीच उपक्रम राबवणार असल्याचे मत मुलांनी व्यक्त केले आहे.
घरच्या आकाश कंदीलामुळे पर्यावरण संरक्षण
बाजारात मिळणारे आकाश कंदील प्लास्टिक, थर्माकोल अशा पर्यावरणाला घातक वस्तूंचे असतात. मात्र, घरीच आकाश कंदील तयार केल्याने घरातील टाकाऊ वस्तू वापरात येऊ लागल्या आहेतच. मात्र, त्याचबरोबर कागद, पुठ्ठा, कपडा यांच्यापासून तयार झालेल्या आकाश दिव्याने पर्यावरणाला संरक्षण मिळत आहे. त्याचबरोबर बाजार मुल्यांपेक्षा कमी दरात आपल्याला हवा तसा आकाश कंदील तयार होत असल्याने मुलांसह कुटुंबियांना देखील समाधान मिळत आहे हे मात्र नक्की.
हेही वाचा - बेनकाब नवाब भी होता है और वह जरूर होगा - अमृता फडणवीस